मुंबई
Sachin Tendulkar क्रिकेटप्रेमींना उत्साहात टाकणारी बातमी समोर आली आहे. क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा निवृत्ती नंतर पुन्हा मैदानावर परत येण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू इंटरनॅशनल मास्टर्स लीग (आयएमएल)च्या दुसऱ्या हंगामात सहभागी होतील, जिथे क्रिकेटच्या इतिहासातील अनेक महान खेळाडू पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आपले कौशल्य सादर करतील.
आयएमएलचा दुसरा हंगाम २४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाणार असून, मुंबई, वडोदरा आणि विशाखापट्टणम या शहरांतील मैदानांवर हा महोत्सव रंगणार आहे. पहिल्या हंगामात ‘हिंदुस्थान मास्टर्स’ संघाने विजेतेपद पटकावले होते आणि दुसऱ्या हंगामात या लीगमधील रोमांच आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
या लीगमध्ये सचिन तेंडुलकर, Sachin Tendulkar ब्रायन लारा यांच्यासह युवराज सिंग, ख्रिस गेल, कुमार संगक्कारा यांसारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू सहभागी होतील. प्रत्येक फटक्यावर प्रेक्षकांचा उत्साह उंचावेल आणि प्रत्येक चेंडूवर थरार उसळेल, असा विश्वास लीगचे आयुक्त सुनील गावसकर यांनी व्यक्त केला. पहिल्या हंगामात लाखो प्रेक्षक उपस्थित राहून लीगला प्रचंड प्रतिसाद दिला होता.आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग हा निवृत्त क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा चमकण्याची संधी देणारा व्यासपीठ आहे. या लीगमुळे क्रिकेटप्रेमींना त्यांच्या आवडत्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या उत्साहात वाढ होईल.
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांसारखे दिग्गज खेळाडू पुन्हा मैदानावर उतरल्याने हा हंगाम क्रिकेट प्रेमींनी खूप उत्साहाने अनुभवण्यास तयार असल्याचे दिसत आहे.