भागलपूर,
wall on the Vikramshila Bridge collapsed भागलपूरमध्ये गंगा नदीवरील विक्रमशिला पुलाच्या एका खांबाजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, घटनास्थळी तज्ज्ञांचे पथक पाठवून तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाला जोडलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग अचानक ढासळला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि दररोज पुलावरून प्रवास करणारे प्रवासी घाबरले असून, पुलाच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने चौकशी सुरू केली आहे. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि तज्ज्ञांच्या पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले असून, तपास अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर सखोल तांत्रिक दुरुस्ती करण्यात आलेली नाही. फक्त वरवरचे रंगकाम करून त्याचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र अंतर्गत मजबुतीकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, पुल बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी कोसळलेली संरक्षक भिंत ही मुख्य रचनेचा भाग नसून तात्पुरती रचना असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा भिंतींचा थेट पुलाच्या मजबुतीवर परिणाम होत नाही, असेही त्यांनी सांगितले. तरीही आवश्यक ती दुरुस्ती करून ती काढण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.