अर्थसंकल्पात वर्धेला जल, जंगल आणि रस्त्यांची सुबत्ता

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
पालकमंत्री डॉ. भोयर यांची पत्रकार परिषदेत माहिती
 
वर्धा, 
Wardha budget मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगिण विकासाला गती देण्यात देणारा आहे. या अर्थसंकल्पात वर्धा जिल्ह्याची दखल घेत रस्ते, बोर आणि धाम प्रकल्पाचे नुतनीकरण तसेच जिल्हामध्यवर्ती बँकेला ६० कोटींची मदत होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. स्थानिक विश्रामगृह येथे आज शनिवार २२ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांसोबत संवाद साधत होते. यावेळी आ. राजेश बकाने, आ. दादाराव केचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, प्रणव जोशी यांची उपस्थिती होती.
 
 
bhokyar
 
Wardha budget  ना. डॉ. भोयर पुढे म्हणाले की, भंडारा येथुन नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्प सुरू करण्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या माध्यमातून वर्धा जिल्ह्यात सिंचनाची सुविधा मिळणार आहे. मात्र, या प्रकल्पाने कोणतेही गाव उठवले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. गावकर्‍यांचा गैरसमज होऊ नये म्हणून ज्या गावातून हा प्रकल्प जाणार आहे त्या गावात प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विकास कामांना प्राधान्य देताना सेलू तालुयात २५ कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. सुरगाव येथे पुलासाठी १० कोटी, हिंगणी चौकाच्या सौंदर्यीकरणाकरिता ३ कोटी, आर्वी पुलगाव रस्ता रुंदीकरणाकरिता ३ कोटी, विरुळ रसुलाबाद पुलाकरिता १ कोटी तर आर्वी येथील विश्रामगृहाकरिता २ कोटी ३३ लाख तसेच हिंगणघाट व देवळी विधानसभा मतदार संघामध्ये रस्ते व पूल विकासाची अनेक कामं मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील रस्त्यांकरिता जवळपास १०० कोटी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील बोर व धाम प्रकल्प जुने झाले आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकल्पाचे नुतनीकरण करण्यात येईल.
 
 
 
Wardha budget शेवटच्या शेतकर्‍याला पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न यातून होईल, असा विश्वासही ना. भोयर यांनी व्यत केला. जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांनाही पुन्हा सक्रीय करायच्या आहेत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धेत पर्यटन वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. नळगंगा वैनगंगा तसेच शतिपिठ मार्गाने विदर्भ- कोकण जोडल्या जाईल. त्याचा विदर्भ आणि कोकणला फायदाच होईल. वर्धा जिल्ह्यातील झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६० कोटी जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्ममाफीची मागणी होत होती. त्यानुसार २ लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. नियमित कर्जफेड करणार्‍यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आले तसेच मख्यमंत्री बळिराजा पांदन रस्ते, मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजनेतुन शेतकर्‍यांना थेट फायदाच होणार असल्याचे ना. भोयर म्हणाले. धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्याची संधी आपल्याला मिळाली. या विधेयकाबाबत गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जबरदस्तीने धर्म बदलण्यावर आता बंधंन येतील. फसवणूक करून कोणालाही धर्मपरिवर्तन करून घेता येणार नसल्याचे ना. डॉ. पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
 
तर धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकसीत राज्याचा रोडमॅप असलेला अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, युवा, बेरोजगार केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. २०४७ मध्ये ५ मिलियन डॉलर्सची अर्थ व्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यत केला. सामाजिक समरतेवरही महायुती सरकार काम करते आहे. महाडच्या चवदार तळ्याचे सौंंदर्यीकरण करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा यांची दीडशेवी जयंती तसेच महात्मा जोतिबा फुले यांचे २०० वी जयंती वर्ष साजरे करण्यात येणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.