पर्यावरणाच्या रक्षणासाठी अर्बन फॉरेस्टची गरज

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
- शिवाजीराव मोघे यांचे प्रतिपादन
जागतिक वनदिनानिमित्त ‘स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार’

नागपूर, 
World Forest Day घनदाट जंगलाचे प्रमाण आता कमीकमी होत चालले आहे. त्यामुळे वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहे. आगामी मानवजातीसमोरील संकट पुन्हा वाढणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसेच हरित पट्टा कायम राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट’ हा उपक्रम राबवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी वनमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
 
 
Shivajirao-Moghe
वनराई प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाईन्स, चिटणवीस सेंटर येथे जागतिक वन दिनाच्या वनसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराई प्रतिष्ठानचे विश्वस्त गिरीश गांधी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख श्रीनिवास राव, महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, नीलेश खांडेकर आदींची उपस्थिती होती.
World Forest Day  वनविभागातील मानद वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत आणि वन्यजीव संरक्षणासाठी भरीव योगदान देणारे उधमसिंग यादव यांना सपत्नीक माजी वनमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकवीस हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
वनसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक
शिवाजीराव मोघे पुढे म्हणाले, जंगल संवर्धनासाठी विविध उपक्रमांची नितांत गरज झाली आहे. वन संवर्धनासाठी उधमसिंग यादव यांच्यासारखे कार्य अन्य व्यक्तींनी सुध्दा केल्यास पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. जंगलातील वनऔषधीतून वन विभागाला आर्थिक पाठबळ मिळू शकते. योग्य नियोजन आणि प्रोत्साहन दिल्यास जंगलातून मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते. मुख्यत: वनात अर्थव्यवस्था दडलेली असल्याने या क्षेत्रात व्यापक विकास होऊ शकतो. याशिवाय आता लोकसहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे वनराई प्रतिष्ठानचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी केले.

जंगल आणि अर्थकारणावर भर द्यावा
जागतिक वन दिनाच्या शुभेच्छा देताना अजय पाटील यांनी सांगितले की, जंगल आणि अर्थकारण या संकल्पनेवर भर देण्याची नितांत गरज आहे. स्थानिक लोकांना रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून वनसंवर्धनाशी जोडण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाला शुभदा फडणवीस, आनंद तिडके, कुलकर्णी, प्रकाश व्यास, नमा जोशी, प्रगती पाटील उपस्थित होते.
प्रत्येकांनी जंगलाचा सन्मान करावा
जंगलातील रोमांचक अनुभव सांगताना उधमसिंग यादव म्हणाले, वन्यजीव बचाव, पाणवठे निर्माण आणि वनसंरक्षणासाठी वन विभागाने अधिक परिश्रम घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकांनी जंगलाचा सन्मान केल्यास वनप्रदेश कायम राखण्यात मोलाची मदत होईल.
वनऔषधीपासून आर्थिक प्रगती
World Forest Day जंगलातून समाजाला लाभ होऊ शकतो यांचे मार्गदर्शन करताना श्रीनिवास राव म्हणाले, वन विभागाने वनऔषधीपासून आर्थिक प्रगती करण्याचे नियोजन केले आहे. आगामी काळात नवनवीन योजना राबविल्या जाणार आहे. यात नागरिकांचा सहभाग राहणार आहे. जंगलातील वाढत्या आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी अभ्यास व ठोस उपाययोजना केल्या जाणार आहे.