Iran-US-Israel War: भारताचा स्पष्ट नकार: 'इराणवर हल्ल्यासाठी भूमी देण्यात आली नाही'

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Iran-US-Israel War : सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या एका दाव्यावर भारत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. या दाव्यात असे म्हटले जात होते की, भारताने अमेरिकेला आपल्या भूमीचा वापर करून इराणवर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

war 
 
 
परराष्ट्र मंत्रालयाच्या फॅक्ट-चेक विभागाने सांगितले की, भारत कोणत्याही देशाला आपल्या भूमीचा वापर दुसऱ्या देशावर लष्करी कारवाई करण्यासाठी कधीही परवानगी देत नाही. अशा प्रकारच्या अफवा आणि चुकीच्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
हा खोटा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे पसरवण्यात आला होता. त्या पोस्टमध्ये असे नमूद केले होते की, अमेरिकेने भारताच्या पश्चिम भागातून इराणवर हल्ला करण्यासाठी लष्करी सुविधा वापरण्याची परवानगी मागितली आहे. या दाव्याला भारत आणि अमेरिकेमधील LEMOA (Logistics Exchange Memorandum of Agreement) या कराराशी जोडून चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले.
 
तज्ज्ञांच्या मते, LEMOA हा भारत आणि अमेरिकेदरम्यान २०१६ मध्ये झालेला एक सहकार्य करार आहे. या कराराचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सहकार्य वाढवणे हा आहे. याअंतर्गत इंधन, दुरुस्ती, पुरवठा, तसेच मानवीय मदत आणि संयुक्त सराव यांसाठी दोन्ही देश एकमेकांच्या सुविधा वापरू शकतात.
 
महत्त्वाचे म्हणजे, हा करार कोणत्याही प्रकारच्या हल्ला किंवा आक्रमक लष्करी कारवाईसाठी वापरला जाऊ शकत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे चुकीची असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
सरकारने पुन्हा एकदा नागरिकांना विनंती केली आहे की, सोशल मीडियावरील अप्रमाणित आणि अफवांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि नेहमी अधिकृत स्रोतांमधूनच माहिती पडताळून घ्यावी.