'जगासाठी धोका, आता कारवाईची वेळ' - नेतन्याहूंचा इराणवर आरोप! VIDEO

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
जेरुसलेम,
Israel US Iran War : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणविरोधात मोठं आणि कठोर विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, गेल्या ४८ तासांत घडलेल्या घटनांमुळे इराण संपूर्ण जगासाठी किती मोठा धोका आहे, हे स्पष्ट झालं आहे. त्यांच्या मते, या काळात इराणने नागरिक भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण ती त्यांच्या हेतूमुळे नव्हे, तर नशिबामुळे टळली, असा आरोप त्यांनी केला.
 
 
WAR
 
 
नेतन्याहू यांनी पुढे सांगितलं की, इराणने जेरुसलेममधील अतिशय संवेदनशील आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागाजवळ हल्ल्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी वेस्टर्न वॉल, चर्च ऑफ द होली सेपल्कर आणि अल-अक्सा मशीद यांसारखी तीन प्रमुख धर्मांची पवित्र स्थळे आहेत. या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला, मात्र पुन्हा एकदा कोणतीही मोठी हानी झाली नाही.
 
तसेच, इराणने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागून दूरवरच्या भागांनाही लक्ष्य करण्याची क्षमता दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, यामुळे युरोपपर्यंतही धोका निर्माण झाला आहे. समुद्री मार्ग आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करून इराण जगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
 
 
 
 
नेतन्याहू यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करत सांगितले की, आता केवळ इस्रायल किंवा अमेरिकेपुरते मर्यादित न राहता इतर देशांनीही पुढे येऊन कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाचाही उल्लेख करत, हा प्रश्न संपूर्ण जगाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.
 
दरम्यान, इस्रायल इराणला जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इस्रायलचे लक्ष्य सामान्य नागरिक नसून इराणचे शासन आणि त्यांचे लष्करी घटक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः इराणच्या क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रमाला पूर्णपणे थांबवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
याशिवाय, इराणमधील जनतेला सध्याच्या सत्तेविरोधात उभे राहण्यासाठी परिस्थिती निर्माण करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच, इराणच्या धोरणांमुळे जागतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार नेतन्याहू यांनी केला.