पुणे
blind couple दिव्यांगत्व म्हणजे आयुष्यभराची झुंज, असे अनेकदा मानले जाते. मात्र पिंपरी-चिंचवडमधील सविता आणि शशीराम आत्माराम या अंध दाम्पत्याने या समजुतीला छेद देत स्वाभिमानाने जगण्याचा आदर्श उभा केला आहे. कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टावर संसार उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे.
सविता आणि शशीराम हे दोघेही हाताने तयार केलेल्या वस्तू बनवतात आणि दिवसभर रस्त्यावर उभं राहून त्यांची विक्री करतात. त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळपासून होते आणि रात्रीपर्यंत ते विक्री करत राहतात. यामागे त्यांची अपार मेहनत आणि जगण्याची जिद्द स्पष्टपणे दिसून येते. मात्र इतक्या परिश्रमानंतरही त्यांच्या हातात दिवसाला केवळ २०० ते ३०० रुपयेच पडतात.
सविता सांगतात की, अंधत्वामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले असून त्याच्या आधारे त्या विविध हॅन्डमेड वस्तू घरीच तयार करतात. “आम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः करतो आणि कोणावरही अवलंबून राहत नाही,” असे त्या अभिमानाने सांगतात.
शशीराम यांच्या मते, रात्री उशिरापर्यंत वस्तू तयार करण्याचे काम सुरू असते आणि दुसऱ्या दिवशी त्या विकण्यासाठी ते बाहेर पडतात. दिवसभर मेहनत करूनही मिळणारी रक्कम अत्यल्प असली तरी त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. “या दोन-तीनशे रुपयांतच आम्ही आमचा संसार आनंदाने चालवतो,” असे ते नमूद करतात.मात्र या दाम्पत्याच्या मनात समाजाबद्दल एक खंतही आहे. लोक भीक मागणाऱ्यांना मदत करतात, पण मेहनत करून वस्तू विकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. “जेव्हा आम्ही भीक मागतो तेव्हा लोक काम करण्याचा सल्ला देतात, पण आम्ही काम करून वस्तू विकायला लागलो की त्याच वस्तू कोणी विकत घेत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.या अंध दाम्पत्याची संघर्षमय कहाणी समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे. स्वाभिमानाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कष्टांची कदर करत समाजाने अशा लोकांना प्रोत्साहन देणे हीच खरी मदत ठरेल.