देशाकडे पुरेसा ऊर्जा साठा- पंतप्रधान मोदी

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
country has sufficient energy reserves: Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना देशातील ऊर्जा साठ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल व गॅसच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत आणि तेथील घडामोडींमुळे भारतीय नागरिकांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीत भारताने तत्काळ मदतकार्य सुरू केले असून, परदेशात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 

Modi
 
 
यासाठी २४ तास कार्यरत मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत लाखो भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात यश आले आहे. इराणमधूनही अनेक विद्यार्थी, विशेषतः वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, परतले असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, या संघर्षामुळे काही लोकांचे जीवितहानी झाली असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत परदेशातील भारतीय दूतावास सतत कार्यरत असून, नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवत आहेत. तसेच शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा पुरवठ्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, भारत आपली बहुतांश ऊर्जा गरज आयातीवर पूर्ण करतो. अशा परिस्थितीत होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेला अडथळा हा चिंतेचा विषय आहे, मात्र देशाकडे पुरेसा तेल साठा उपलब्ध आहे. देशातील तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्येही स्वतंत्र साठा असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
एकत्र येऊन संकटाचा सामना करू
याच भाषणात पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांवरील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करताना व्यापारी जहाजांवरील हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले. अशा घटनांचा परिणाम केवळ संबंधित देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होतो, असे त्यांनी सांगितले. भारत सातत्याने या भागातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाबाबत बोलताना त्यांनी या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो, त्यामुळे देशाने सतर्क आणि एकजूट राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कोरोना महामारीच्या काळात दाखवलेल्या एकजुटीची आठवण करून देत, अशा परिस्थितीतही संयम, सहकार्य आणि चिकाटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी, पंतप्रधानांनी समाजात अफवा पसरवणारे, अपप्रचार करणारे तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. सर्व राज्य सरकारांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करावा, असे आवाहनही त्यांनी लोकसभेत केले.