विदर्भाचा आधुनिक कर्ण अनंतात विलिन

*शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
datta-meghe : विदर्भाचे दिग्गज नेते, राजकारणासह शिक्षण, आरोग्य, सहकार या क्षेत्रांवर आपली अमिट छाप सोडणारे माजी मंत्री, माजी खासदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्यावर पवनार या त्यांच्या मूळ गावी आज सोमवार २३ रोजी शासकीय इतमामात शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सागर यांनी मुखाग्नी दिली. त्यांच्या घरी मागायला आलेला व्यक्ती कधीही रित्या हाताने परतला नाही. कोणाला काय मदत केली याची नोंद त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे विदर्भाचा आधुनिक कर्ण अनंतात विलिन झाला असेच म्हणावे लागेल. सुर्य अस्ताला जात असताना सेवेचे व्रत घेतलेले दत्ता मेघे इहलोकीच्या यात्रेला निघाले होते.
 
 
FKL
 
 
 
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार अमर काळे, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री अशोक शिंदे, माजी मंत्री मदन येरावार, विधान परिषदेचे सदस्य अभिजित वंजारी, माजी आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार राजू तिमांडे, कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, रवी गुळकरी, डॉ. अभ्युदय मेघे, दिलीप पणकुले, भाजपाचे विदर्भ संघटक उपेंद्र कोठेकर, भाजपाचे नेते जिल्हाध्यक्ष संजय गाते, भूपेंद्र शहाणे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, माजी पोलिस आयुत परमवीर सिंग, किरण पांडव, दत्ता मेघे यांच्या पत्नी शालिनी मेघे, युवा उद्योजक वैभव काशिकर, सचिन अग्निहोत्री, प्रदीप बजाज, शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पवनार येथील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दत्ता मेघे यांचे पार्थिव नागपूर येथुन वर्धेत आणल्या गेले. त्या ठिकाणी माजी मंत्री मदन येरावार, सेवाग्राम रुग्णालयाचे विश्वस्त परमानंद तापडिया, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, विरेंद्र जगताप, संजीव लाभे, अरुण काशिकर, अविनाश देव, अर्चना वानखेडे आदींसह त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अन्त्यदर्शन घेतले. यावेळी अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सावंगी (मेघे) येथील त्यांच्या निवासस्थानाहून सजवलेल्या ट्रकमधून अन्त्ययात्रा निघाली. दत्ता मेघे अमर रहे! च्या घोषणा दिल्या जात होत्या. ६ वाजताच्या सुमारास दत्ता मेघे यांचे पार्थिव पवनार येथील त्यांच्या शेतात आणल्या गेले. शासकीय इतमामात अन्त्यसंस्काराला ६ वाजून ५ मिनिटांनी प्रारंभ झाला. वेदीवर पार्थिव ठेवल्यानंतर पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. पार्थिवावरील तिरंगा झेंडा पुत्र सागर मेघे यांच्या स्वाधिन केला. पवित्र मंत्रात आणि धार्मिक विधीनंतर सागर मेघे यांनी दत्ता मेघे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळीही दत्ता मेघे अमर रहेच्या घोषणा देत वातावरण शोकमग्न झाले होते. सुर्यअस्ताला जात असताना दत्ता मेघे यांचा जीवन प्रवास थांबला होता.
 
 
 
प्रत्येकाचा हार
 
 
दत्ता मेघे हे सर्व सामान्यांना आपलेसे वाटत होते. त्यांच्या विविध संस्थांमध्ये शेकडोंना त्यांनी उपजीविकेला लावले असल्याने आपल्याला पोटापाण्याला लावणार्‍यांनी आपल्या नेत्याचे अन्त्यदर्शन घेण्यासाठी सावंगी (मेघे) येथील निवासस्थानी गर्दी केली होती. येथे येणार्‍या प्रत्येकाच्या हाती झेंडूच्या मुलांचे हार दिल्या जात होते. अतिशय शिस्तबद्धरित्या आलेला प्रत्येक व्यती दत्ता मेघे यांच्या पार्थिवाला हार घालून अभिवादन करीत होता. संपूर्ण शहरामध्ये दत्ता मेघे यांना श्रद्धांजलीचे फ्लेस लावण्यात आले होते. मात्र, त्या फ्लेसवर समस्त वर्धेकर असा उल्लेक करून वर्धेकरांनी आज एकत्रितरित्या अखेरचा निरोप दिला.