प्रतिक्रीया...
datta-meghe : विदर्भाचे नेते दत्ता मेघे यांचे रविवार २२ रोजी नागपूर येथे निधन झाले. आज २३ रोजी त्यांच्या पार्थिवावर पवनार येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वर्धा जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांच्या निधनावर व्यक्त केलेल्या भावना.
आमचे छत्र हरपले : ना. भोयर
आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान माजी खासदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे आज आमच्यात नाहीत, ही गोष्ट मनाला खूप वेदना देणारी आहे. आमचे छत्र हरपले आहे, अशी जाणीव प्रत्येक क्षणी होत असल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. दत्ताजी मेघे यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांनी आपल्या कार्यातून, विचारातून आणि अथक परिश्रमातून असंख्य लोकांच्या आयुष्याला दिशा दिली. समाजासाठी जगणे म्हणजे काय, हे त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून दाखवून दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे अनेकांना शिक्षण, संधी आणि नवी उभारी मिळाली, त्यांनी माणसं घडवली. त्यांच्या सहवासात राहणारा प्रत्येकजण काहीतरी शिकत गेला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची शिकवण आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. त्यांनी दाखवलेला मार्गच आता आपल्यासाठी दिशा ठरणार आहे, असे ना. डॉ. पंकज भोयर म्हणाले.
...................
शिक्षणप्रेमी आणि समाजसेवक गमावला : रामदास तडस
माजी खासदार,लोकनेते दत्ताजी मेघे यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक दूरदर्शी नेता, शिक्षणप्रेमी आणि समाजसेवक गमावला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी दिली. मेघे साहेब यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लोकहिताला प्राधान्य दिले. जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठामपणे आवाज उठवला आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या संस्थांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडले असून, समाजात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. समाजकार्याच्या क्षेत्रातही मेघे यांचे कार्य उल्लेखनीय होते. आरोग्य, शिक्षण आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी राहिला. त्यांचे आयुष्य हे सेवा, समर्पण आणि नेतृत्व यांचे उत्तम उदाहरण होते, अशी प्रतिक्रिया तडस यांंनी दिली.
................
राजकारणातले पितामह हरपले : आ. कुणावार
समुद्रपूर : आधारवड माजी मंत्री माजी खासदार, ज्येष्ठ नेते तसेच वर्धा जिल्ह्यातील राजकारणातले पितामह दत्ताजी मेघे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. ते आमचे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू व जनतेसाठी सदैव कार्यरत असलेले नेतृत्व हरपले आहे. त्यांनी आयुष्यभर जनसेवा रुग्ण सेवा केली शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत जिल्ह्याला उंच शिखरावर नेऊन अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांच्या जाण्याने जी फोकळी निर्माण झाली ती कधी भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया आ. कुणावार यांनी दिली.
.................
एका महान युगाचा अंत : आ. वानखेडे
विदर्भाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे जनक, दत्ताजी मेघे यांच्या निधनाने एका महान युगाचा अंत झाला आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे ते एक ऋषितुल्य व्यतिमत्त्व होते. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी उभे केलेले कार्य येणार्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन एका पितृतुल्य छायेसारखे होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण विदर्भासह वर्धा जिल्ह्याची आणि माझी वैयतिक मोठी हानी झाली असल्याचे आ. सुमित वानखेडे म्हणाले.
....................
असंख्य कुटुंबांचा आधार हरपला : आ. बकाने
देवळी : माजी खा. दत्ताजी मेघे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने समाजजीवनातील एक भकम आधारवड हरपला. शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आणि दीर्घकालीन परिणाम करणारे आहे. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आणि जपलेल्या मूल्यांमुळे असंख्य कुटुंबांना आधार मिळाला आहे. दत्ताजी मेघे हे केवळ लोकनेते नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ आणि समाजहितासाठी झटणारे मार्गदर्शक होते. त्यांच्या साधेपणात महानता आणि कार्यात प्रामाणिकपणा होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी संवेदना आ. राजेश बकाने यांनी व्यत केली.
..................
दानशूर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड : अॅड. कोठारी
हिंगणघाट : दत्ताजी मेघे यांचे निधन चटका लावून गेले. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मेघे यांनी स्वबळावर आपली वाट निर्माण केली होती, अशी प्रतिक्रिया हिंगणघाट कृउबाचे सभापती
अॅड. सुधीर कोठारी यांनी दिली.
..............
दिलदार भत वचितच जन्माला येतो : लाभे
वर्धेचे सुपूत्र दत्ताजी मेघे यांच्या निधनाचे वृत्त कळताच घरचे वडिलधारे व्यतिमत्त्व एकाएकी नाहीसे व्हावे, तसे दु:ख झाले. ते पुलोद सरकारमध्ये मंत्री होते तेव्हापासून आपण त्यांना ओळखतो. सन १९७९ मध्ये आजोबा आप्पाजी जोशी यांचे अन्त्ययात्रेत दत्ता मेघे व प्रभाताई राव हे दोन तत्कालीन मंत्री सहभागी झाले होते. वर्धेचे प्राचीन श्रीराम मंदिर हे त्यांच्या आस्थेचे केंद्र होते. जेव्हा जेव्हा शय होईल त्यावेळी ते मंदिरात दर्शनाला येत. श्रीरामनवमीचे दिवशी तर आवर्जून असत. मंदिराला व मंदिराचे उपक्रमांना ते सर्वतोपरी मदत करीत. विशेषत: वर्धेचे वैशिष्ट्य ठरलेल्या पाडवा पहाट कार्यक्रमात २००९ पासून ते प्रतिवर्षी उपस्थित राहात. प्रकृती व वय याची पर्वा न करता याहीवर्षी ते पूर्णवेळ उपस्थित होते. असा दिलदार भत वचितच जन्माला येतो. श्रीरामप्रभू आपले ईश्वरीय तेजात त्यांना स्थान देवो, अशी प्रतिक्रीया श्रीराम मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष संजीव लाभे यांनी दिली.
...............
गावातील मैत्री शहरापर्यंत जोपासली ः वझुरकर
वर्धा : दत्ता मेघे आणि माझे मित्रत्त्वाचे संबंध होते. आम्ही दोघेही एकाच गावातील म्हणजे पवनार येथील असून दोघांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. पुढे दत्ता मेघे यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने त्यांनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतली. तेव्हापासून ते मागे आलेच नाही. नुकतीच त्यांची पवनार येथे अजय गांडोळे यांच्या घरी भेटसुद्धा झाली. त्यांची आठवण आली की, अधूनमधून नागपूर येथे भेटीला जात होतो, अशी प्रतिक्रिया दत्ता मेघे यांचे मित्र व ज्येष्ठ पत्रकार, लोकतंत्र सेनानी हरिभाऊ वझूरकर यांनी दिली.
...............
गोरगरिबांचा मसीहा गेला : वांदीले
हिंगणघाट : सर्वसामान्य जनतेचा कैवारी, हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे करणारे एक लोकमान्य नेते म्हणून दत्ताजींची ओळख होती. स्वतःच्या प्रतिभेवर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे एक आगळे स्थान त्यांनी निर्माण केले होते. विविध विचारधारेच्या समाजकार्यकर्त्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वर्धा जिल्ह्याचा गौरव महाराष्ट्रात वाढवीला अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिली.
................
दिलदार व दमदार मित्र गमावला : पं. अग्निहोत्री
वर्धा : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ माजी खासदार, माजी मंत्री दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनाने एक दिलदार व दमदार मित्र गमावला अशी भावना पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केली. दत्ताजी मेघे यांचे आपल्या परिवारासोबत ऋणानुबंध असून अत्यंत जिव्हाळ्याचे पारिवारिक संबंध होते. पाडवा पहाट कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. त्यांनी रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात तुमच्याकडे येईल असे सांगितले होते. परंतु, नियतीला हे मान्य नसावे,त्यांना काळाने हिरावून नेले,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
.................
दत्ता मेघे आमचे आभिमान होते : शेंडे
मेघे साहेब हे अत्यंत साध्या परिस्थितीतून वर आलेले होते. आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा व जनसेवेच्या वृत्तीमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली. वर्धा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारून गरिबांची सेवा करण्याचे मोलाचे योगदान राहिले असून, अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती, फी माफी देऊन त्यांनी हजारो कुटुंबांना आधार दिला. विशेष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असतानाच पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आमदारकी, खासदारकी तसेच मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी या सर्व पदांवर प्रामाणिकपणे काम करत जनतेची सेवा केली. गरजू, गरीब व सर्वसामान्यांसाठी त्यांचे दार नेहमीच खुले होते. त्यांच्या दारात आलेला कोणीही व्यक्ती कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. माझे वडील प्रमोद बाबू शेंडे यांचे त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. दरवर्षी आमच्या निवासस्थानी होणार्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहत असत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब होती, अशी प्रतिक्रिया शेखर शेंडे यांनी दिली.
...........
दातृत्वाचे चालते-बोलते विद्यापीठ दाताभाऊ : पाठक
दत्ताजी मेघे अर्थात सर्वांचे लाडके ’दाताभाऊ’ म्हणजे मूर्तिमंत दातृत्व! त्यांच्या असीम दानशूरपणाची कीर्ती सर्वदूर दरवळलेली होती. सुरुवातीला केवळ एका व्यावसायिक निमित्ताने आपण त्यांच्याशी जोडला गेलो, परंतु काळाच्या ओघात त्यांच्या अथांग स्नेहाचा वर्षाव माझ्यावर झाला आणि माझे जीवन खर्या अर्थाने समृद्ध झाले. कुणीतरी एखाद्या सत्कार्यासाठी तर कुणी कार्यक्रमाच्या वर्गणीचे पावती पुस्तक घेऊन आशेने उभे असायचे. साहेबांचा दरबार कधीच कुणाला विन्मुख करत नसे. त्यांच्या हातांतून दानाची सरिता अविरत वाहत असे; आलेल्या प्रत्येकाला ते किमान पाच हजारांची मदत हसत-हसत करत. आपण आपल्या परीने आणि शुद्ध भावनेने त्याला द्यावे. त्यांच्या खर्या-खोटेपणाचे पाप-पुण्य ते निस्तारतील,अशी त्यांची भावना होती. जेव्हा आपण आपली थैली रिकामी करतो तेव्हाच पुढच्या वेळी ती पुन्हा भरण्यासाठी देवाला ती रिकामी दिसते! थैली नेहमी रिकामी ठेवत जावी. आज त्यांच्या निधनाने सामाजिक जीवनातील एक ’कर्णपर्व’ खर्या अर्थाने संपुष्टात आले आहे, अशी प्रतिक्रिया येथील वास्तू विशारद मकरंद पाठक यांनी दिली.
.................
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे नेते : नयना तुळसकर
जनतेच्या प्रश्नांशी घट्ट नाळ जोडून काम करणारे, साधेपणा आणि माणुसकी जपणारे असे मोठे व्यक्तिमत्त्व दत्ताजी मेघे आज आपल्यातून निघून गेले आहे. विदर्भाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राच्या उभारणीत त्यांंचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. राजकीय जीवनात त्यांनी विविध सभागृहांमधून जनतेच्या प्रश्नांना सातत्याने आवाज दिला. मात्र केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे ही त्यांची खरी ओळख ठरली. ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. त्यांचा सेवाभाव, दातृत्व आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी दिली.
................
राजा सारखा जगलो : अग्निहोत्री
काही दिवसांपूर्वीच दत्ताजी मेघे यांची भेट झाली होती. त्यांचासोबत बोलताना नेहमीच जिव्हाळा जाणवत होता. आपल्याला आता बरं वाटत असल्याचे ते म्हणाले होते. आपल्या आयुष्यात आपण जी मदत करीत गेलो त्याचा चांगला परतावा आपल्याला मिळतो आहे. मुलं चांगले निघाले, ही माझी पुण्याई आहे. आपण आयुष्य राजा सारखे जगलो असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता मेघे यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकच नव्हे तर कौटुंबिकही अनेक आठवणी आहेत, अशी प्रतिक्रिया युवा व्यावसायिक व जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी दिली.
.................
नेता असावा तर असा : काशिकर
दत्ताजी मेघे म्हणजे वर्धा अशी ओळख काही वर्षात झाली होती. दत्ता मेघे आकर्षक व्यतिमत्त्व होते. प्रत्येकाची आपुलकीने ते विचारपुस करीत होते. गुढीपाडव्याला पाडवा पहाट आणि रामनवमीला श्रीराम जन्माला ते आवर्जुन उपस्थित राहत होते. असा नेता आता होणे नाही, अशी प्रतिक्रिया श्रीराम मंदिर शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष व व्यापारी संघटनेचे नेते अरुण काशिकर यांनी दिली.
........................
कनवाळू व्यतित्त्व हरपले : देशपांडे
अत्यंत गरिबीतून, परिस्थितीला शरण न जाता स्वकर्तुत्व आणि स्व गुणांच्या आधारावर दत्ताजी मेघे यांनी महाराष्ट्रात त्यातल्या त्यात वर्धा आणि नागपूर विदर्भाच्या केंद्रस्थानी असलेल्या जिल्ह्यात जे सेवाभावी प्रकल्प आणि कार्य उभे केले की ज्यामुळे ते अनेक परिवाराचे अन्नदाताच ठरले. त्यांचा कनवाळू आणि मायाळू शांत स्वभाव अनेकांचा आश्रय होता. जात-पात धर्म आणि राजकारण याचा कोणताही विचार न करता त्यांनी समाजोपरी जे कार्य केले तेच त्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रभक्तीची साक्ष देणारा आहे. आजपर्यंत त्यांच्या दारावर गेलेला कोणताही याचक कधीही रिक्त हस्ताने परत आला नाही. आम्हा वर्धेकरांकरिता असे व्यक्तित्व पुन्हा होणे दुर्लभच अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, स्वा. सावरकर स्मारक स्मृती उद्यान वर्धा आणि श्रीराम मंदिर देवस्थान पवनारचा अध्यक्ष या नात्याने आदरांजली अशी प्रतिक्रिया श्याम देशपांडे यांनी दिली.
.................
ऊर्जा स्तोत्र हरपले : डॉ. पर्बत
गेल्या तीन दशकापासून दत्ताजी मेघे यांच्या छत्र छायेखाली वावरताना कधी आपण एकाकी किंवा एकटा आहो, असे जाणवलेच नाही. त्यांचे स्नेह, प्रेम व आशीर्वाद आपल्याला लाभला हे भाग्यच समजतो. सागर ग्रामीण युवा मंच या सामाजिक संघटनेचा युवा वर्ग आणि त्यानंतर विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या माध्यमातून मेघे यांच्या संघटनेशी जुळलो आणि सामाजिक कार्यात त्यांच्या मार्गदर्शनात अग्रेसर राहिलो. त्यांच्या सानिध्यात जीवनाचे खूप काही सार अनुभव, जीवन जगण्याची कला मला नेहमीच मिळत गेली. जीवन कसे जगावे याची शिकवण मला सामजिक व माझ्या राजकीय जीवनात मिळाली, अशी प्रतिक्रीया संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी व्यत केली.
.........