श्रीरामपुरात पिण्याच्या पाण्याचे ‘दुर्भिक्ष’

- उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची झळ - टँकरच्या पाण्यावर भागते तहाण

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
drinking-water-scarcity : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रात येणार्‍या श्रीरामपूर येथे पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. पाणी पुरवठ्यासाठी मंजूर असलेल्या नळ जोडणीच्या अर्धवट कामामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नगर पंचायतीकडून या परिसरात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
 
 
 
K
 
 
 
गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या निर्मीतीदरम्यान, त्या परिसरातील चार गावांचे पुनर्वसन गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रात श्रीरामपूर म्हणून करण्यात आले. गेल्या २० ते २५ वर्षांपासून चारही गावातील प्रकल्पग्रस्त या भागात राहतात. असे असले तरी जवळपास ८०० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित रहिवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही तरतूद करण्यात आली नसून पाणी पुरवठ्याच्या नावावर केवळ ६ विंधन विहीरींसह ५ सार्वजनिक विहिरींची निर्मीती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जल जीवन मिशन अंतर्गत या परिसरात पाईप लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
 
 
मात्र, गेल्या दिड वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी उन्हाळ्याची चाहूल लागताच परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय योजना म्हणून, गोरेगाव नगर पंचायत प्रशासनाने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता श्रीरामपूरवासी आता आपली तहान भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून टँकरच्या पाण्यावर कधीपर्यंत आपली तहान भागवायची असा प्रश्न श्रीरामपूर येथील नागरिक करू लागले आहे. तेव्हा याकडे लक्ष देत प्रशासनाने परिसरात पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईप लाईनचे काम त्वरीत पूर्ण करून परिसरात नळ योजना सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे.
 
 
श्रीरामपूर भागात पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईप लाईनचे काम सुरू झाले आहे. ते काम पूर्ण होण्यास वेळ लागेल. पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना म्हणून, पुनर्वसित वसाहतींमधील नागरिकांसाठी टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
- पवन रहांगडाले, नगरसेवक, नगर पंचायत गोरेगाव