कॅनबेरा,
Earthquake in the South Pacific Ocean दक्षिण पॅसिफिक महासागरात रविवारी उशिरा रात्री समुद्राखाली जोरदार भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी नोंदवण्यात आली असून तो अवघ्या दहा किलोमीटर खोलीवर झाल्याने त्याचा प्रभाव अधिक जाणवला. दरम्यान भूकंपानंतर पुन्हा धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हा भाग जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण पट्ट्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अग्निवलय’ क्षेत्रात येतो. या पट्ट्यात पृथ्वीच्या विविध भूस्तर पट्ट्या सतत एकमेकांवर आदळत आणि सरकत असतात, त्यामुळे येथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी हालचाली घडत राहतात. जगातील बहुतांश भूकंप याच भागात होत असल्याची नोंद आहे. दरवर्षी जगभरात लाखो भूकंप होतात, त्यापैकी अनेक लहान असतात; मात्र काही भूकंप मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवू शकतात. सध्या तरी या भूकंपामुळे मोठ्या नुकसानीची माहिती समोर आलेली नसली, तरी परिस्थितीवर शास्त्रज्ञांचे बारकाईने लक्ष असून पुढील हालचालींचा आढावा घेतला जात आहे.