बुलढाणा,
buldhana-news : खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर आकर्षक दावे आणि भ्रामक माहिती देत ग्राहकांची दिशाभूल करणार्या कंपन्यांवर आता राज्य सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक प्रकरणांमध्ये पाकिटावर नमूद केलेली माहिती आणि प्रत्यक्ष घटकांमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शयता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशा फसव्या प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पाऊल उचलले असून, नियमांचे उल्लंघन करणार्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तब्बल १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, आकर्षक दावे आणि भ्रामक माहितीच्या आधारावर अनेक खाद्यपदार्थ विकले जात असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर नमूद केलेले घटक प्रत्यक्ष उत्पादनात अत्यल्प प्रमाणात किंवा फक्त नावापुरतेच असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे आकर्षक दावे करून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याशी संबंधित धोके निर्माण होऊ शकतात. ग्राहकांची दिशाभूल करणार्या आणि नियमांचे उल्लंघन करणार्या खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांवर सरकारने कडक कारवाईचा इशारा दिला असून, अशा कंपन्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. खाद्यपदार्थ खरेदी करताना पाकिटाच्या मागील बाजूस दिलेली पोषणमूल्यांची माहिती नीट तपासणे आवश्यक आहे. घटक, साखर, मीठ, फॅटचे प्रमाण तसेच उत्पादनाची तारीख पाहूनच खरेदी केल्यास आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित पर्याय निवडता येतो. मिसब्रँडेड किंवा भ्रामक माहिती असलेले खाद्यपदार्थ आढळल्यास ग्राहकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार नोंदवावी. याशिवाय फूड सेफ्टी कनेट अॅप ग्राहक हेल्पलाइन किंवा संबंधित अन्न सुरक्षा अधिकार्यांकडेही ऑनलाइन किंवा लेखी तक्रार करता येते. पाकिटावरील माहिती आणि प्रत्यक्ष उत्पादनातील घटक यामध्ये तफावत आढळल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.