इस्लामाबाद,
Foreign players should not come to Pakistan पाकिस्तान सुपर लीगच्या २०२६ हंगामापूर्वीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत आधीच मर्यादा घालण्यात आल्या असताना आता परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही अहवालांनुसार, एका कट्टर सशस्त्र गटाने परदेशी खेळाडूंना पाकिस्तानात येऊ नये, असा इशारा दिल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जमात-उल-अहरार या संघटनेचे नाव समोर येत आहे. या गटाने सध्याच्या परिस्थितीत मोठी टी-२० स्पर्धा आयोजित करणे सुरक्षित नसल्याचे म्हटले असून, क्रिकेटविरोधी भूमिका नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानात येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेला २६ मार्चपासून सुरुवात होणार असली, तरी त्याआधीच निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयोजकांची अडचण वाढली आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच ही स्पर्धा केवळ दोन शहरांमध्ये आणि प्रेक्षकांविना आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. अधिकृत कारणांमध्ये पश्चिम आशियातील तणाव आणि इंधन दरवाढीचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु आता सुरक्षेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे. या हंगामात अनेक नामांकित परदेशी खेळाडू सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ॲडम झाम्पा, मोईन अली आणि डेव्हन कॉनवे यांसारख्या खेळाडूंचा समावेश असल्याने स्पर्धेबाबत उत्सुकता होती. मात्र, सुरक्षेची भीती वाढल्यास हे खेळाडू माघार घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर क्रिकेट मंडळाकडून अद्याप स्वतंत्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आयोजकांकडून सुरक्षेची खात्री दिली जात असली, तरी सध्याच्या घडामोडींमुळे स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. पुढील काळात विविध देशांच्या क्रिकेट मंडळांची भूमिका आणि खेळाडूंचे निर्णय यावर या स्पर्धेचे भविष्य अवलंबून राहणार आहे.