नाशिक,
Investigation into Ashok Kharat case नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे या प्रकरणाला नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच आता शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांपर्यंत तपास पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थानच्या माजी विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवनिका संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अशोक खरात यांच्याकडे होती. काही वर्षांपूर्वी जुन्या विश्वस्तांनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये खरात यांनी आपल्या पत्नीचाही समावेश केल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर रुपाली चाकणकर या देखील या विश्वस्त मंडळाचा भाग होत्या.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्ये संपल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, खरात यांना अटक झाल्यानंतर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. संस्थानमधील कामकाज, निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी केली जात आहे. याच अनुषंगाने संबंधित विश्वस्तांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रत्येक धर्मात अशा प्रवृत्तीचे लोक आढळतात
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना, प्रत्येक धर्मात अशा प्रवृत्तीचे लोक आढळतात असे म्हणत कठोर शब्दांत हल्लाबोल केला. तसेच पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना पूर्ण मदत केली जाईल, असे आवाहन त्यांनी केले.
विशेष तपास पथक स्थापन
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, त्यामध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशोक खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडिओच्या माध्यमातून गंभीर प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे.