वॉशिंग्टन,
Israel US Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत मोठा निर्णय जाहीर करत सध्या तेहरानवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. पुढील पाच दिवस इराणवर कोणतीही लष्करी कारवाई केली जाणार नसून, या कालावधीत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू राहणार आहे. या चर्चेनंतरच पुढील रणनीती ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सध्या २४ दिवस पूर्ण झाले असून, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा सुविधांवर होणारे सर्व हल्ले तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभर या चर्चा सुरू राहणार असून, त्याच्या यशावरच पुढील निर्णय अवलंबून असेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या संघर्षाची पार्श्वभूमीही गंभीर आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये मोठी लष्करी कारवाई केल्याचा दावा करण्यात आला होता. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह काही वरिष्ठ नेते आणि लष्करी अधिकारी ठार झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलविरोधात जोरदार प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले. गेल्या काही दिवसांत या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून, जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. तेल आणि वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने अनेक देशांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.