मारेगावात भव्य ‘पशुधन वैभव मेळावा’ आज

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
रोख पारितोषिकांचीही आकर्षक उधळण

मारेगाव, 
'Livestock Glory Fair' मातीशी नाळ जुळलेल्या बळीराजाच्या आयुष्यात पशुधन ही केवळ संपत्ती नसून त्याच्या घामाच्या थेंबाचे साक्षीदार, जीवलग सहचर आहेत. या जिवाभावाच्या नात्याला मानाचा मुजरा देण्यासाठी मारेगाव नगरीत मंगळवार, 24 मार्च रोजी तालुकास्तर भव्य पशू प्रदर्शनाचा सोहळा रंगणार आहे.
 
 
pashau
 
पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ जिल्हा परिषद आणि मारेगाव पंचायत समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभा राहणारा हा देखणा उपक्रम म्हणजे ग्रामीण जीवनाच्या समृद्ध परंपरेचे जणू एक जिवंत चित्रच ठरणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त आवारात सकाळी 8.30 पासून या सोहळ्याला प्रारंभ होईल. 8.30 ते 10.30 या वेळेत पशुधनाची नोंदणी करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात बैलजोड्यांच्या टापांतील जोश, देशी व संकरित गायींचे सौंदर्य, म्हशींची देखणी ठेवण, शेळ्यांची चपळता आणि कुक्कुट पक्ष्यांची रंगत अशा विविधतेचा देखणा संगम अनुभवायला मिळणार आहे. जणू ग्रामीण जीवनाचे स्पंदनच या एका व्यासपीठावर एकवटणार आहे.
 
 
'Livestock Glory Fair'  उत्कृष्ट पशुधनाचा गौरव करताना आयोजकांनी रोख पारितोषिकांची आकर्षक उधळणही केली आहे. बैलजोडी, गायी व म्हैस गटासाठी 10,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक, संकरित वासरांसाठी 5,000 रुपये, शेळी गटासाठी 5,000 रुपये आणि कुक्कुट गटासाठी 1,500 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक गटात द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन अनेकांच्या मेहनतीला सन्मान मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे, हा सोहळा केवळ मारेगाव तालुक्यातील पशुपालकांसाठीच खुला असून, स्थानिक पशुधनाच्या गुणवत्तेला अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने केवळ स्पर्धा नव्हे, तर पशुसंवर्धनाच्या नव्या दिशा, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि शाश्वत शेतीच्या वाटचालीचा संदेशही दिला जाणार आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांसह या सोहळ्यात सहभागी होऊन या समृद्ध परंपरेचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.