सात दिवसांपासून सी-डेट कंपनीत लॉकआउट

*कामगारांचा संताप उफाळला; काळ्या फिती लावून निषेध *पत्रपरिषदेत कंपनीच्या मनमानी कारभारावर टीका

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पं.), 
lockout-at-c-date-company : येथील सी-डेट कंपनीत मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर लॉकआउटमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रहार सी-डेट कामगार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी आपली व्यथा मांडली. यावेळी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. संघटनेचे अध्यक्ष कुरवाडे यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली. मात्र, आजही गोरगरीब कामगारांवर अन्याय होत असून आम्ही गुलामीसारखे जीवन जगत आहोत.
 
 

J
 
 
कंपनीने कोणतेही स्पष्ट कारण न देता मुख्य गेटला कुलूप लावून कामगारांना कामापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला. कामगारांच्या मते, काही महिला व पुरुष कामगारांनी मागण्यांचे निवेदन माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते दिल्यानंतर कंपनीने त्याचा राग धरून ही कारवाई करीत काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. महिलांकडून कंपनीचा ड्रेस परत मागविण्यात आला आहे. तसेच अपूर्ण प्रशिक्षण असतानाही महिलांना मशीनवर बसविण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला. यासंदर्भात कामगार आयुत कार्यालयात बैठक होऊनही कोणताही तोडगा निघाला नसल्याचे संघटनेने सांगितले. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही अन्नत्याग उपोषण करू. तरीही न्याय न मिळाल्यास कुटुंबासह कंपनीसमोर आंदोलन करू, असा इशारा अध्यक्ष कुरवाडे यांनी दिला.
 
 
या पत्रकार परिषदेस प्रहार संघटनेचे आर्वी विधानसभा अध्यक्ष जय बेलखडे उपस्थित होते. बेलखडे यांनी आ. सुमित वानखेडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी आ. वानखेडे यांनी कामगार मंत्री यांच्याशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मात्र, कामगारांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन त्यांनी केले. सध्या निवडणुकीच्या कामानिमित्त ते केरळ येथे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
 
यावेळी कामगारांनी प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
कंपनीने कोणतेही स्पष्ट कारण न देता मुख्य गेटला कुलूप लावून कामगारांना कामापासून वंचित ठेवले. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग उपोषण करू. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास कुटुंबासह कंपनीसमोर आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष कुरवाडे यांनी दिला.