सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश!

नीलम गोऱ्हे संतापल्या

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
सातारा,
Neelam Gorhe got angry सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले असून पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित सर्व व्हिडिओ फुटेज ताब्यात घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
 
 

Neelam Gorhe 
दरम्यान, या निवडणुकीवेळी जिल्हा परिषदेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी प्रशासनाशी आणि पोलीस यंत्रणेशी संघर्ष करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी झालेल्या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना पोलिसांनी घेरल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारानंतर भाजपने बहुमताच्या जोरावर अध्यक्षपद मिळवले.
 
 
जबाबदार असलेल्यांचीही चौकशी करा
या निर्णयावर शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जिल्हा पोलीस अधीक्षकांची तत्काळ बडतर्फी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली. मंत्र्यांवर हल्ला झाल्याची घटना आपण प्रथमच पाहत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यास विरोध दर्शवला. वस्तुस्थितीची पूर्ण माहिती न घेता असा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण वादावर सभागृहात तीव्र चर्चा रंगली असून, पोलीस यंत्रणा प्रत्यक्षात कार्यरत होती का, तसेच घटनास्थळी घडलेल्या घटनांची नेमकी वस्तुस्थिती काय होती, याबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जयकुमार गोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, गोंधळाच्या परिस्थितीस जबाबदार असलेल्यांचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत मांडले.