‘अत्यंत सावध राहा...अमेरिकेच्या आपल्या नागरिकांसाठी सूचना!

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Notice to our US citizens इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण बनत आहे. या युद्धाला तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी शांततेची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरही असुरक्षिततेची भावना वाढली असून, ऊर्जा पुरवठ्यावरही त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जगभरातील आपल्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विशेषतः मध्यपूर्वेत राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. परदेशात असलेल्या नागरिकांनी स्थानिक अमेरिकी दूतावास किंवा वाणिज्य दूतावासांकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
Notice to our US citizens
युद्धामुळे अनेक ठिकाणी हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून, काही भागांमध्ये हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, मध्यपूर्वेबाहेरील काही ठिकाणांवरही अमेरिकेशी संबंधित संस्थांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणशी संबंधित गट परदेशातील अमेरिकी हितसंबंधांवर हल्ले करू शकतात, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, नागरिकांनी अद्ययावत सुरक्षा माहिती मिळवण्यासाठी अधिकृत माध्यमांवर लक्ष ठेवावे आणि प्रवासाचे नियोजन करताना संबंधित देशातील ताज्या सूचना तपासाव्यात, असेही सांगण्यात आले आहे. आतापर्यंत या संघर्षाच्या काळात सौदी अरेबियातील रियाध, संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, कुवेतमधील कुवेत शहर आणि इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकी दूतावासांवर हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.