यवतमाळ,
Ram Navami श्रीराम नवमीनिमित्त येत्या गुरुवार, 26 मार्च रोजी यवतमाळ शहरात भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रदेश सेवाप्रमुख राम लोखंडे यांनी दिली. यावेळी आयोजन समितीचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज औदार्य, प्रचार प्रसार प्रमुख राहुल ढोके, शहर अध्यक्ष गोविंद मोर, रामनवमी शोभायात्रा समितीचे संयोजक अभिजित डोंगरे, संतोष हरणखेडे, श्याम नाकोडे, मनीष बिसेन, सचिन तुरकर, अंकुश बगमारे हे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना राम लोखंडे म्हणाले, श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही शोभायात्रा यंदाही विविध वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांनी सजलेली असणार आहे. जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तींचे पूजन करून दुपारी 3 वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल.
Ram Navami यंदा दाक्षिणात्य शैलीत साकारण्यात आलेल्या सुशोभित रामरथामध्ये रामदरबार विराजमान राहणार असून, हा रथ रामभक्तांंच्या हस्ते ओढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गोवा येथील शिमगोत्सवात प्रथम क्रमांक पटकावणारा ‘दुर्गासुर वध’ चित्ररथ, गणपती व कार्तिकेय यांचे असुरांसोबतचे युद्धदृश्य तसेच ‘पुलिकाली’ वाघनृत्याचे सादरीकरण असणार आहे.
यासोबतच कर्नाटक येथील प्रसिद्ध बावली नृत्यदेखील सादर करण्यात येणार आहे. तसेच पांढरकवडा येथील 20 आदिवासी दंडार नृत्य कलाकार, दारव्हा तालुक्यातील 100 जणांचे भजनी मंडळ, कोलाम पोडांवरील डफ पथक, तसेच रामायणकालीन आणि सामाजिक विषयांवरील 100 हून अधिक देखावे या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.
Ram Navami स्थानिक व्यायामशाळा व आखाड्यांमधील युवकांकडून पारंपरिक कसरतींचेही सादरीकरण होणार आहे. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवे ध्वज आणि पताकांनी सजावट करण्यात येणार असून भजनगायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. शहरात सध्या रामभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी श्रीरामांच्या प्रतिमा व सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून बजरंग दलाच्या 500 स्वयंसेवकांचा सुरक्षा समितीत समावेश करण्यात आला आहे. जयहिंद चौकातून सुरू होणाèया या शोभायात्रेचे संत सेना चौक येथे महाआरतीनंतर समापन होणार असून, उत्कृष्ट चित्ररथ व देखाव्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
मोटारसायकल प्रभातफेरीचे आयोजन
रामनवमी निमित्त सकाळी 7 वाजता श्री दत्त मंदिर, दत्त चौक येथून मोटारसायकल प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांतून रामनामाच्या गजरात युवक सहभागी होत जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरात प्रभातफेरीचे समापन करण्यात येईल. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीने केले आहे.