होर्मुझ अल्टिमेटमनंतर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
तेहरान,
Attacks on Iranian energy projects पश्चिम आशियातील तणाव अधिक तीव्र होत असताना इराणमधील दोन महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत दिलेल्या ४८ तासांच्या इशाऱ्याची मुदत संपताच ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. इराणशी संबंधित निम-सरकारी वृत्तसंस्थेने मंगळवारी पहाटे ही माहिती देत या घटनेची गंभीरता अधोरेखित केली आहे.
 

energy projects
 
या हल्ल्यांमध्ये इस्फहान परिसरातील नैसर्गिक वायूशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच खोरमशहर येथील वीज प्रकल्पाच्या गॅस वाहिनीला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हे हल्ले नेमके कोणत्या देशाने केले याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. इस्रायल किंवा अमेरिकेकडूनही या कारवाईची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली नाही.
 
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू न केल्यास ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी एका वरिष्ठ इराणी नेत्याशी चर्चा सुरू असल्याचा दावाही केला होता आणि मुदत वाढवण्याची घोषणाही केली होती. मात्र, इराणने हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत अशा कोणत्याही चर्चेला नकार दिला आहे. तसेच, अमेरिकेकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली असून, पुढील काळात या संघर्षाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.