बोर प्रकल्पात पाण्याअभावी वाघिणीचा गावाकडे मोर्चा

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
सेलू, 
bore project बोर प्रकल्प परिसरात पाण्याच्या भीषण टंचाईमुळे वन्यजीव थेट गावाच्या उंबरठ्यावर येऊ लागले आहेत. नुकतीच एका वाघिणीने आपल्या बछड्यासह गावाच्या दिशेने हालचाल केल्याची घटना समोर आली असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीतही वनविभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
 
 
bore
 
उन्हाळा लागताच जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेतात. तृणभक्षीही पाण्याच्या शोधात येत असतानाच त्यांचा पाठलाग करीत हिंस्त्र प्राणीही पाणी आणि शिकारीसाठी गाव गाठू लागतात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरील हल्ले तसेच मानव-वन्यजीव संघर्ष पहायला मिळतो. उन्हाळ्यात दरवर्षी वनविभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठे तयार केले जाते. मात्र, यंदा अद्यापही बोर प्रकल्पातील पाणवठे कोरडेच असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या झळांनी जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असताना वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कृत्रिम पाणवठे, टँकरद्वारे पाणीपुरवठा किंवा पाण्याची साठवण यासारख्या मूलभूत उपाययोजना वेळेत न केल्यामुळेच आज वाघासारखे हिंस्त्र प्राणी गावाकडे वळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यावरच जाग येणार्‍या वनविभागाचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वनविभाग केवळ कागदोपत्री कामे करत असून प्रत्यक्षात जंगलातील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
bore project  दरम्यान, या घटनेनंतर शेतकरी, गुराखी व सामान्य नागरिक भयभीत झाले असून, दैनंदिन कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. मुलांना शाळेत पाठवताना पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून वेळेत वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था व सुरक्षेवर उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी तातडीने कृती करणे गरजेचे असताना, वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.