female village revenue officer गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात सापळा कारवाई करत ग्राम महसूल अधिकारी महिला कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. गायत्री बोरकर (४१) असे लाचखोर महिला तलाठीचे नाव आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा विटभट्टी व्यवसाय असून माती उत्खनन प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी आरोपी ग्राम महसूल अधिकारी गायत्री बोरकर यांनी त्यांच्याकडे ३७ हजार रुपयांची लाच मागितली होती. यापैकी १० हजार रुपये त्यांनी यापूर्वी १२ मार्च रोजी स्वीकारले होते, तर उर्वरित रक्कम देण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करून सोमवारी २३ मार्च रोजी अर्जुनी मोरगाव येथे सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपीने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने तिला रंगेहात ताब्यात घेतले.female village revenue officer आरोपीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून तिच्याकडील मोबाईलही ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी महिला असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तिला नोटीस देऊन मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद राऊत व उमाकांत उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.