आशापुरा जिनिंगला भीषण आग

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
लाखो रुपयांचा कापूस जळाला

पांढरकवडा, 
Fire at Ashapura Ginning आशापुरा जिनिंगमध्ये मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मिलमधील लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. विशेष म्हणजे, पांढरकवडा नगर परिषदेची अग्निशमन गाडी ऐनवेळी नादुरुस्त असल्याने आग विझवण्यात विलंब झाल्याने नुकसान अधिक वाढले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
 
 
asha
 
मिळालेल्या माहितीनुसार, गिमा टेक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कापूस आणि डुग्या वाहून नेणाèया सायलेन्सरमधून उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने मिलमध्ये साठवलेला कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीची माहिती मिळताच पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांची गाडी घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वणी, घाटंजी, राळेगाव आणि यवतमाळ येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करावे लागले.
 
 
Fire at Ashapura Ginning अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर चारही शहरांच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत मिलमालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीच्या देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मिलचा मोठा भाग जळून खाक झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आगीचे नेमके कारण आणि एकूण नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सध्या सुरू आहे.