भागवत चेंबर्स’ची नितांत शिक्षण संस्थेला 2 लाखाची मदत

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर, 
समाजाप्रतिची कर्तव्यभावना, समर्पण आणि संस्कार यांची सांगड घालत येथील ‘भागवत चेंबर्स’कडून दरवर्षी वर्षप्रतिपदेनिमित्त ‘Fund dedication ceremony’ ‘निधी समर्पण सोहळा’ आयोजित केला जातो. गत अकरा वर्षांपासून तो अखंड सुरू आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात जागृत करणारा हा सोहळा असतो. यंदा जिवती तालुक्यातील दुर्गम भागात कार्यरत ‘नितांत बहुउद्देशीय शिक्षण संस्था’ यांना 2 लाख 1 हजाराचा हा निधी समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ महिला अधिवक्ता अ‍ॅड. संध्या मुसळे व अ‍ॅड. राजू सागोरे उपस्थित होते. तर मंचावर ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. रवींद्र भागवत, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माधवी भागवत, नितांत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजेश राठोड यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
 
 
bharat
 
‘नितांत बहुउद्देशीय शिक्षण संस्था’ या संस्थेने ‘माउंट इंग्लिश स्कूल’च्या माध्यमातून आदिवासी, बंजारा व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून, काही शिक्षक म्हणूनही समाजसेवा करीत आहेत. अ‍ॅड. संध्या मुसळे यांनी, भागवत चेंबर्सचा उपक्रम समाजात समर्पणाची भावना निर्माण करणारा आणि दिशा देणारा आहे, असे मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. राजू सागोरे यांनी, अ‍ॅड. भागवत यांना विधीक्षेत्रातील वटवृक्ष असे संबोधले. त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेल्या ज्ञानाचा उल्लेख केला. त्यांनी त्यांच्या साधेपणाचे आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचे विशेष कौतुक केले. विशेष म्हणजे, कोरोनाकाळातही या उपक्रमात खंड पडला नाही. त्या कठीण काळातही भागवत चेंबर्सने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाखांहून अधिक रक्कम दिली होती, ही समाजनिष्ठेची जिवंत साक्ष आहे, असे ते म्हणाले. तर राजेश राठोड यांनी, संस्थेच्या कार्याची माहिती देत भागवत चेंबर्सचे मनःपूर्वक आभार मानले. संचालन अ‍ॅड. प्रशांत ठाकूर यांनी, तर प्रास्ताविक अ‍ॅड. अभय पाचपोर यांनी केले. आभार अ‍ॅड. आकाश गिरी यांनी मानले.

समर्पणाच्या संस्कृतीचा वारसा पुढे न्या : अ‍ॅड. भागवत
‘Fund dedication ceremony’  अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी, ‘जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात...’ या ओळींचा भावार्थ मांडताना सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, हीच खरी संस्कृती आहे. इतरांचे हक्क हिरावून घेण्याची वृत्ती म्हणजे विकृती, तर प्रत्येकाने आपलेच पाहणे ही प्रकृती, मात्र मला मिळालेल्यातून इतरांना काय देता येईल हा विचार करणे म्हणजे संस्कृती होय. याच संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी यावेळी केले.
 
11 वर्षांची अखंडित परंपरा
या सोहळ्याची संकल्पना 2014 मध्ये मांडण्यात आली आणि 2015 पासून तिची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. आज 11 वर्षांनंतरही ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. भागवत चेंबर्समधील आजी-माजी अधिवक्त्यांनी एकत्र येत समाजातील सेवाभावी संस्थांसाठी दरवर्षी निधी उभारण्याचा हा उपक्रम समाजातील सहकार्य आणि समर्पणाचा उत्कृष्ट आदर्श ठरला आहे.