गॅस टंचाईचा भडका अवकाळीचा तडाखा

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
वेध. . .
 
नितीन शिरसाट
gas shortage आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका पेट्रोल, डिझेल यासह दररोज स्वयंपाक घरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याला बसत आहे. इंधन तुटवड्यामुळे ग्रामीण व शहरी भागात पुन्हा एकदा गॅसचा भडका उडाला आहे. त्यातही गॅस सिलेंडर चोरीच्या घटना व छुप्या अवैध मार्गाने गॅस विक्रीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर हॉटेल व्यावसायिक तसेच चौपाटीवर व्यवसाय करणारे लहान व्यावसायिक करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने महसूल व पुरवठा विभागाचे पथक तयार करून धाडसत्र सुरू केले आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईने ग्रामीण भागात मातीच्या चुलींचा वापर वाढला आहे. सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने लाकूड व गोवऱ्या वापरून चुलीवर स्वयंपाक करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. गॅस टंचाई वाढल्याने आजही कोणतीही यंत्रसामुग्री न वापरता पूर्णपणे हाताने तयार केलेल्या मातीच्या चुलींना मागणी वाढली असून जुन्या काळातील चुलीवरच्या जेवणाची आठवण केली जात आहे. सध्या हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांकडून चुलीला मागणी वाढली आहे.
 
 

गॅस टंचाईचा भडका 
 
 
पारंपरिक पद्धतीने माती व शेणापासून बनविल्या जाणाèया चुलींना मोठी मागणी आहे. घरगुती चूल 250 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत तर हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी चूल 700 ते एक हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. आजही चुलीवरच्या भाकरीची चव आवडत असल्याने घरात गॅस असला तरी काही लोक मातीच्या चुली घेऊन जात आहे. आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा आणि इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
 
हिंदुस्थान पेट्रोलियम एच. पी. गॅस, इंडियन गॅस, भारत गॅस यासह इतर कंपन्यांच्या सिलेंडर विक्री केंद्रावर ग्राहकांच्या रोज सकाळी 7 वाजेपासून सिलेंडरचा ट्रक संपेपर्यंत लांबलचक रांगा आहेत. बुलढाणा शासकीय रुग्णालयाच्या स्वयंपाकघरातून चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही ज्यांना सिलेंडरची बुकिंग मोबाईलवर करावी लागते त्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. संगणक यंत्रणा ठप्प झाल्याने ग्राहकांची केवायसी अडकून पडली आहे. तर दुसरीकडे निसर्गाच्या अवकाळी लहरीपणाचा फटका शेतकèयांना बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारांसह वादळी वाèयासह पाऊस पडल्याने शेतीपिके फळबाग भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव यासह इतर जल्ह्यातील गहू, कांदा, मका, ज्वारी यासह द्राक्षे, मोसंबी, केळी, डाळिंब, टरबूज, भाजीपाला शिवाय यावर्षी लवकरच आलेला आंब्याचा मोहर व कैèया गारपिटीने व वादळी पावसाने उन्मळून पडले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. कापणी करून ठेवलेले पीकही पावसात भिजल्याने शेतकèयांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे शेतकèयांवर दुहेरी संकट ओढवले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकèयांकडून होत आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांत 18 व 19 मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात रबीतील पिकांसह उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे 13 पैकी 11 तालुक्यांत 3 हजार 802 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे शेगाव तालुक्यातील आळसणालगत असलेल्या खेर्डा शिवारात अवकाळी पावसादरम्यान वीज पडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात येत असलेल्या किन्ही येथील आबा हिरामण माळी यांचा मृत्यू झाला.gas shortage देऊळगाव राजा, लोणार आणि चिखली तालुक्यात गारपीट झाली. यासोबतच मोताळा आणि मलकापूर तालुक्यातील जळगाव खान्देश जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या पट्ट्यात वादळी वाèयासह पाऊस व तुरळक गारपीट होऊन नुकसान झाले आहे. शेतकèयांच्या आशांवर पाणी फेरले. उभे पीक भिजल्याने व नुकसान झाल्याने अपेक्षित नफा हातातून निसटला असून, आधीच वाढत्या खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकèयांसमोर नव्या आर्थिक संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. मका, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, केळी, पपई, बाजरी, चिया, संत्रा, मोसंबी व आंबा या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसाग्रस्तांचे पंचनाने तातडीने करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अस्मानी व सुलतानी संकटात सध्या सर्वसामान्य तसेच शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.
मो. 9881717828