नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास आमचे असहकार्य!

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
गोंडवाना विद्यापीठाचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला इशारा
अधिसभेत गाजली घटत्या विद्यार्थ्यांची समस्या

चंद्रपूर, 
'Gyan Ganga Gharoighari' ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ब्रिद आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण सोडलेल्यांना प्रवेश दिला जातो, हे चांगलेच. त्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. पण या मुक्त विद्यापीठाने 10 वी 12 वी च्या नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास यापुढे गोंडवाना विद्यापीठ अजिबात सहकार्य करणार नाही, संलग्नित महाविद्यालयांची कुठलीही सुविधा यशवंतराव मुक्त विद्यापीठाला दिली जाणार नाही, असा कडक इशारा गोंडवाना विद्यापीठाने दिला आहे.
 
 
gondawana
 
गोंडवाना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यावर 23 मार्च रोजीच्या अधिसेभेत गांभीर्याने चर्चा झाली. विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने का घटत आहे, यावर विविध सिनेट सदस्यांनी मते मांडली. विद्यार्थी संख्या घटण्याचे मुख्य कारण म्हणजे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 10 वी 12 वीच्या नियमित विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश देत आहे. त्यांची परीक्षा घेण्याची पध्दत बघता, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिकडे आकृष्ट होत आहेत, असे मत अधिसेभेत संस्थाचालक, प्राचार्य तसेच प्राध्यापकांनी मांडले.
 
 
'Gyan Ganga Gharoighari' कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मात्र यावेळी प्राध्यापकांना आरसा दाखवला. प्राध्यापक मंडळींना नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. पण ते त्याबाबत किती गंभीर आहे, हे सांगायची गरज नाही. त्यांनी येणार्‍या काळाचा वेध घ्यावा. जर स्वतःमध्ये बदल केले नाही, तर पुढे कठीण होईल, असे ठाम मत कुलगुरूंनी मांडले. अनेक सिनेट सदस्यांनीही, गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने दर्जेदार शिक्षणासाठी जोरकसपणे प्रयत्न करावा. विद्यार्थी वर्गात आले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्यावा आणि ते नियमित वर्गात येतील यासाठी प्रयत्न करावे असेही म्हटले. या चर्चेत सिनेट सदस्य विवेक शिंदे, संजय सिंग, संजय गोरे, लेमरात लडके, प्रशांत दोंतुलवार, संजय रामगिरवार, धमेंद्र मुनघाटे, दीपक धोपटे, शिली नरवाडे, मिलींद भगत, संजय साबळे, सतीश कन्नाके आदींनी भाग घेतला.

अभ्यासक्रम अद्ययावत कराः रामगिरवार
गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना हवे ते अभ्यासक्रमात आणले पाहिजे. जग झपाट्याने बदलत आहे. नवे अभ्यासक्रम तयार करणे व त्यात ‘एआय’ आणि ‘डाटा सायंस’ सारख्या विषयांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. तसेच अभ्यासक्रम हे व्यावसायाभिमुख हवे. ज्यातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल. विद्यापीठाबाहेर काय चालले आहे, हे बघितले पाहिजे. त्यानुसार अभ्यासक्रम तयार केला पाहिजे आणि तो तेवढयाच ताकदीने विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे. अभ्यासक्रम हे परिसरातील विविध कारखान्यांच्या गरजांशी साधर्म्य साधणारा असावा. खाजगी विद्यापीठे हे करीत आहेत. आपणही ते केले पाहिजे. प्राध्यापकांचे प्रशिक्षण तर हवेच शिवाय त्यांची ‘इंटरनशिप’ होणे गरजेचे आहे. तज्ज्ञ प्राध्यापक तयार करणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, उपक्रम राबवणे आणि संशोधनावर लक्ष्य केंद्रीत करणे आदींबाबत गोंडवाना विद्यापीठाने गंभीर असावे, तेव्हाच विद्यार्थी आपल्याकडे येतील, असे स्पष्ट मत संजय रामगिरवार यांनी मांडले.

...अन्यथा आम्ही सोय पुरवणार नाहीः कावळे
'Gyan Ganga Gharoighari' यशवंतराव मुक्त विद्यापीठ आमच्या नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहे, हे चुकीचे आहे. मुळात गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्येच या मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे. आमच्याच प्राध्यापकांच्या सेवा ते घेतात. तरीही जर ते ऐकत नसेल, तर यापुढे आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही. तसे पत्र आम्ही संबंधित विद्यापीठाला पाठवत आहोत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी तभाला दिली.