राज्यातील अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
मुंबई,
heat and rain in the state मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात हवामानाचे दोन्ही टोकाचे स्वरूप पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागांत पावसाची हजेरी सुरू असताना दुसऱ्या बाजूला उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा दिला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रकोप अधिक वाढणार असल्याने सकाळी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
 
 
heat and rain
 
तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पारा ३८ अंशांच्या जवळ पोहोचू शकतो. उष्णतेसोबत दमट वातावरण असल्याने उकाडा अधिक जाणवणार आहे. अशा परिस्थितीत दीर्घकाळ उन्हात राहिल्यास आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडणे, तसेच बाहेर पडताना डोके झाकणे, पाणी सोबत ठेवणे अशा खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
दरम्यान, राज्यातील काही भागांत अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असली तरी उष्णतेचा प्रभाव वाढत जाणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील या बदलत्या परिस्थितीचा विचार करून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.