हमी द्या, नाहीतर... इराणचा अमेरिकेला इशारा

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
तेहरान,
Iran's warning to America अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तडजोडीची शक्यता व्यक्त केल्यानंतरही पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट, इराणकडून अधिक कठोर आणि आक्रमक भूमिका समोर आली आहे. इराणचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांच्या सर्व अटी पूर्ण होईपर्यंत युद्ध थांबणार नाही आणि इराण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही.
 
Iran
 
 
रेझाई यांनी सांगितले की, इराणला झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई, सर्व आर्थिक निर्बंध हटवणे आणि अमेरिकेने त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याची आंतरराष्ट्रीय हमी मिळणे अत्यावश्यक आहे. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही तडजोड शक्य नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.यावेळी इराणचे प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच त्यांनी विरोधकांना आखाती प्रदेश सोडण्यास भाग पाडले जाईल, असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, इराणचे सैन्य पूर्ण क्षमतेने कारवाई करत असून युद्धादरम्यान दबाव कायम ठेवण्यासाठी सातत्याने मोहीम सुरू आहे.
 
 
 
दरम्यान, रेझाई यांनी असा दावा केला की, अमेरिका तयार असती तर हे युद्ध आठवडाभरापूर्वीच संपुष्टात येऊ शकले असते. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लढाई सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकल्यामुळे परिस्थिती चिघळली, असे त्यांनी म्हटले. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी असे सांगितले की, अमेरिका एका वरिष्ठ इराणी नेत्याशी संवाद साधत आहे आणि इराण तडजोडीसाठी उत्सुक आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनरयांनीही एका इराणी नेत्याशी चर्चा केली आहे, मात्र त्या नेत्याचे नाव त्यांनी उघड केले नाही. उल्लेखनीय म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ल्यांची मालिका सुरू केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली आणि त्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.