विधीमंडळात उमरखेड मतदारसंघातील तातडीच्या प्रश्नांवर आमदार किसन वानखेडे यांचा आवाज

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : विधीमंडळ अधिवेशनात नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध तातडीचे व जनतेच्या जीवनाशी निगडित प्रश्न प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले.
 
 
y24March-Kisan
 
आ. वानखेडे यांनी इसापूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असतानाही पैनगंगा नदी कोरडी पडल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. 1991 पासून या नदीद्वारे 40 ते 50 गावांना तसेच जनावरे व वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. मात्र सध्या 30 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने पाणी सोडण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. चालू वर्षासाठी किमान 1 कोटी 30 लाख रुपये भरल्याशिवाय पाणी सोडणार नसल्याची भूमिका अधिकाèयांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
त्यामुळे शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून पैनगंगा नदीत नियमित पाणी सोडण्याची व कालव्यांद्वारे योग्य नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली. कोरटा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
 
या शाळेत सुमारे 430 विद्यार्थी शिक्षण घेत असूनही त्यांच्यासाठी योग्य वसतीगृह, जेवणाची सुविधा आणि पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याची स्थिती त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व राहण्याच्या सोयींसाठी तातडीने वर्गखोल्या, वसतीगृह उभारणीसाठी निधी द्यावा तसेच रिक्त शिक्षक पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.
 
 
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरण 2024 च्या पार्श्वभूमीवर आमदार किसन वानखेडे यांनी माहूर तीर्थक्षेत्रासह परिसरातील पर्यटन विकासासाठी ठोस उपाययोजना सुचवल्या. उमरखेड येथे गणेश विसर्जन सुविधा नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मार्लेगावजवळ पैनगंगा नदीपुलाजवळ घाट उभारण्याची मागणी त्यांनी केली.
 
 
मरसूळ येथील तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. पाणीपुरवठा, शिक्षण सुविधा आणि पर्यटन विकास या महत्त्वाच्या विषयांवर आ. किसन वानखेडे यांनी विधीमंडळात ठोस भूमिका मांडत शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे उमरखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.