आखाती देशांतील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य

जागतिक परिस्थितीवर मोदींचे स्पष्ट मत

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi's views on the global situation पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत महत्त्वाचे निवेदन केले असून, या परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला असून, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या उपलब्धतेवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय वास्तव्यास असून, त्यांच्या सुरक्षिततेची आणि उपजीविकेची जबाबदारी भारतासाठी मोठी आहे. युद्धामुळे या भागातील व्यापार मार्गांवर परिणाम होत असून, त्यामुळे इंधन आणि खतांच्या नियमित पुरवठ्यावरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 
 
Modi
 
आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम
पंतप्रधानांनी सांगितले की, भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, प्रभावित देशांशी संवाद साधला जात आहे. या चर्चांमध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गांचा अवलंब करणे हाच भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील राष्ट्रप्रमुखांसोबत दोन वेळा चर्चा झाल्याची माहिती दिली. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक कठीण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भारतीय खलाशी कार्यरत असून, त्यांची सुरक्षितता ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असेही ते म्हणाले. अशा परिस्थितीत, देशातील सर्व राज्यांनी स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या गरजांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. जगासमोर शांतता आणि संवादाचा संदेश देणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.