नवेगावबांध येथे राज्यस्तरीय आरोग्य समितीचा आढावा

अर्जुनी-मोरगावच्या आरोग्य यंत्रणेला मिळणार नवी उभारी

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,

Navegaonbandh health review अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यस्तरीय आरोग्य विषयक समितीने नवेगावबांध येथे प्रत्यक्ष भेट देत सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत रिक्त पदे तात्काळ भरणे व आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
 

Navegaonbandh health review 
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी अर्जुनी-मोरगाव व सडक अर्जुनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याने, ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने तातडीने भरून सेवा सुरळीत करण्याचे आदेश समितीने दिले. ज्या ठिकाणी दवाखान्यांच्या इमारती अपुर्‍या आहेत किंवा जागेचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी तात्काळ जमीन उपलब्ध करून नवीन इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांनी जबाबदारीने सेवा बजावावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. बैठकीला आ. राजकुमार बडोले, राज्य आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, डॉ. सरिता हजारे, नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
आ. बडोलेंच्या पाठपुराव्याला यश...
नुकत्याच झालेल्या मुंबई येथील अधिवेशनात आ. राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोरगाव व सडक अर्जुनी परिसरातील आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेचा मुद्दा ठळकपणे मांडत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष दौरा करून समस्यांचा आढावा घेत ठोस निर्णय घेतले.