वर्धा,
चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. याचे उत्तम उदाहरण येथील युवा क्रिकेटपटू Saurabh Dubey सौरभ दुबे यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा संधीचे दार उघडले असून आता त्यांना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
गेल्यावर्षी सौरभ दुबे यांची निवड सनराईजर्स हैदराबाद संघाने लिलावात केली होती. मात्र, दुखापतीमुळे त्यांना खेळता आले नव्हते. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघातील वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धेतील डावखुर्या वेगवान गोलंदाज सौरभ दुबे यांची निवड करण्यात आली आहे.
Saurabh Dubey सौरभ दुबे हे शहराजवळील म्हसाळा परिसरातील रहिवासी आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते बंगळुरूमध्ये आयकर विभागात कार्यरत आहे. त्यांनी यापूर्वी भारताच्या अंडर-२३ संघातही स्थान मिळवले होते. तसेच अलीकडेच नागपुरात आयोजित टी-२० विदर्भ प्रीमियर लीगमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, सौरभ यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटपासून केली होती. त्यांच्या प्रतिभेची दखल घेत त्यांना लेदर बॉलने क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर आयपीएलपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.