गजानन महाराज मंदिरात श्रीरामजन्मोत्सव प्रारंभ

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
नंदु कुळकर्णी
शेगाव, 
shri-ram-janmashtami : संत गजानन महाराज संस्थान, शेगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामजन्मोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा उत्सव श्रीराम नवमीपर्यंत साजरा केला जात असून, यंदा श्रींच्या मंदिरातील हा १३२ वा उत्सव आहे.
 

sheago 
 
 

उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात ‘अध्यात्म रामायण स्वाहाकार’ यज्ञाला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. वेदमूर्ती आणि ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात यज्ञपूजन पार पडले. हा यज्ञ चैत्र शुद्ध पंचमीपासून सुरू झाला असून, चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच २६ मार्च रोजी पूर्णाहुती व अवभृत स्नान होणार आहे.

 

संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडा, भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री नामवंत महाराजांचे कीर्तन असे कार्यक्रम भक्तिभावात रंगत आहेत.

 

उत्सवानिमित्त श्री गजानन महाराज समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण शेगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या आणि पालख्या टाळ-मृदंगाच्या गजरात येथे दाखल होत आहेत. संस्थानतर्फे त्यांचे स्वागत व आदरातिथ्य केले जात आहे.

 

भाविकांची गर्दी लक्षात घेता एकेरी मार्गाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद व पारायण कक्षासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, २५ आणि २६ मार्च रोजी भाविकांसाठी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार असून, अधिकाधिक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.