मुंबई,
Strong jump in stock market मंगळवारी सकाळच्या व्यवहाराच्या सुरुवातीलाच देशातील भांडवली बाजारात उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल १,०४० अंकांनी वाढत ७३,७३६ च्या पातळीवर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही सुमारे ३५० अंकांच्या वाढीसह २२,८६० च्या पुढे गेला. बहुतांश क्षेत्रांमध्ये खरेदीचा ओघ दिसून आल्यामुळे बाजारात सर्वत्र तेजीचे वातावरण निर्माण झाले.
आजच्या व्यवहारातवित्त, दागदागिने, विमान वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. एकूणच, वाहन, बँकिंग, ऊर्जा, औषधनिर्मिती तसेच सार्वजनिक आणि खासगी बँक क्षेत्रांनी सुमारे एक ते दोन टक्क्यांची वाढ दर्शवली. मोठ्या कंपन्यांबरोबरच मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभागांमध्येही खरेदी वाढल्याने व्यापक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही बाजारावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविषयक कारवाई काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, इराणकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले असून, काही देशांच्या मध्यस्थीने चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.कच्च्या तेलाच्या दरात सुमारे दहा टक्क्यांची घट होऊन ते जवळपास १०० डॉलरच्या आसपास आले आहेत. युद्धस्थिती शमू शकते, अशी अपेक्षा बाजारात व्यक्त होत असली तरी पुढील काळात या संदर्भातील घडामोडींमुळे बाजारात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.