लोकसभेत वाढणार महिला'राज'

५४३ ऐवजी ८१६ जागांचा प्रस्ताव!

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Women's Raj in Lok Sabha केंद्र सरकार लोकसभेच्या रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तावानुसार सध्याच्या ५४३ जागा वाढवून ८१६ करण्यात येऊ शकतात, तसेच एकूण जागांपैकी सुमारे एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा विचार आहे. यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारकडून अधिवेशनात दुरुस्ती विधेयक सादर केले जाऊ शकते. या नव्या आराखड्यात महिला प्रतिनिधित्व वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार असून, एकूण जागांपैकी २७३ जागा महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारसंघांची पुनर्रचना २०११ च्या जनगणनेच्या आधारे करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
 
 
Women
 
असा असेल जागेचा वाटप
या प्रस्तावामुळे देशातील विविध राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये जागांची संख्या ८० वरून १२० पर्यंत वाढू शकते. बिहारमध्ये ४० वरून ६०, पश्चिम बंगालमध्ये ४२ वरून ६३, तामिळनाडूमध्ये ३९ वरून ५९, महाराष्ट्रात ४८ वरून ७२, कर्नाटकात २८ वरून ४२, केरळमध्ये २० वरून ३०, आंध्र प्रदेशात २५ वरून ३८, गुजरातमध्ये २६ वरून ३९, राजस्थानमध्ये २५ वरून ३८, दिल्लीत ७ वरून ११, ओडिशामध्ये २१ वरून ३२ आणि झारखंडमध्ये १४ वरून २१ जागा वाढण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावावर राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याबाबत बैठक घेतली असून, सत्ताधारी आघाडीतील नेत्यांकडूनही चर्चा सुरू आहे. या बदलामुळे राजकीय समतोलावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सुरुवातीला दक्षिण भारतातील काही राज्यांनी लोकसभेच्या जागा वाढवण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, आता या प्रस्तावात सर्व राज्यांना प्रमाणानुसार जागावाढ दिली जात असल्याने विरोध कमी होण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे देशाच्या लोकशाही रचनेत मोठा बदल घडू शकतो, असे मानले जात आहे.