अफवेचा फुल्ल टॅन्क, देवळीत ग्राहकांचा ओव्हरफ्लो!

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
देवळी,
devali petrol pump युद्धाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी रात्री देवळी शहरात पेट्रोल टंचाईची अफवा वार्‍यासारखी पसरताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. पेट्रोल पंप बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी वाहनांसह मोठ्या प्रमाणात गर्दी केली. परिणामी, अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 

अफवेचा फुल्ल टॅन्क, देवळीत ग्राहकांचा ओव्हरफ्लो! 
 
गर्दी अनावर झाल्याने देवळी शहरातील तीन पेट्रोल पंप तात्पुरते बंद करण्यात आले. दरम्यान, इसापूर व देवळी येथील एकच पंप सुरू असल्याने त्या ठिकाणी पेट्रोल पंपाला यात्रेचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिक पेट्रोलसाठी धावपळ करत असल्याचे चित्र होते. यासोबतच ऑटो, मालवाहू तसेच चारचाकी वाहनांना लागणार्‍या डिझेलसाठी मोठी गर्दी केली होती. २ ते ३ हजाराच्या वर डिझेल कोणालाही मिळत नव्हते. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीती पसरली होती. शेतकर्‍यांचे गहू, चणा पीक काढण्याचा हंगाम सुरू असल्याने हडंबा, थ्रेशर, ट्रॅटर, हार्वेस्टर आदी वाहनांना डिझेल मोठ्या प्रमाणात लागते. परंतु, भीतीपोटी शेतकरी व वाहनधारकांमध्ये आता काय होणार, अशी दहशत पसरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
देवळी येथील इस्सार पेट्रोल पंप संचालक विलास जोशी यांच्याशी चर्चा केली असता पेट्रोल-डिझेलची कोणतीही टंचाई नसून पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. जनतेमध्ये पेट्रोल संपणार असल्याच्या भीतीयुत अफवा पसरत असल्याने नागरिक पेट्रोल भरण्याकरिता पंपावर गर्दी करत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील व्यवस्थापन सुद्धा कोलमडू शकते. नागरिकांनी शांतता राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तसेच देवळी तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी चांदनी शिवरकर व देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पेट्रोल-डिझेल विषयी कुठेही टंचाई नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.devali petrol pump
विशेष म्हणजे, प्रशासनाकडून पेट्रोल टंचाई किंवा साठा संपल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचे निदर्शनास आले. या अफवांमुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे.