सात महिन्यांनंतर फरार आप आमदाराला अटक

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
सनौर,
Absconding AAP MLA arrested सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेल्या आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांना अखेर अटक करण्यात आली आहे. सनौर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या आमदारावर बलात्कार, फसवणूक आणि धमकी असे गंभीर आरोप होते. पटियाला पोलिसांनी अखेर त्यांच्या हालचालींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ते फरार होते आणि या काळात त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.
 
 

AAP MLA arrested
त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, एका महिलेने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत तिने आरोप केला की, आमदाराने स्वतःला घटस्फोटित असल्याचे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि नंतर तिच्याशी विवाहही केला. मात्र, त्यानंतर तिला धमक्या देण्यात आल्या, तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोपही तिने केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
 
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती, परंतु पठाणमाजरा अनेकदा त्यांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित करून त्यांच्या शोधासाठी आदेश जारी केले होते. दरम्यान, आमदारांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपण फरार नसून जाणीवपूर्वक बचावासाठी पळ काढल्याचा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथून निसटल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी अनेक वेळा छापे टाकले, तरीही ते सापडले नव्हते. या विलंबावर विरोधकांनी राज्य सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर टीका केली होती. अखेर सात महिन्यांच्या शोधानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.