वाशीम,
Akash Verma : ध्येय स्पष्ट आणि ठाम असेल तर यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय आकाश वर्मा यांनी केले. ग्रंथसंस्कृतीला चालना देत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित ग्रंथोत्सव २०२५ च्या दुसर्या दिवशी पार पडलेल्या परिसंवाद सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आयोजित या सत्रात कारंजाचे उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना वर्मा यांनी पाच मूलभूत तत्त्वे स्पष्ट केली. अभ्यासात सातत्य ठेवणे, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळ देणे, सूक्ष्म नियोजन करणे आणि थकवा जाणवल्यास विषय बदलून अभ्यास करणे या सवयी अंगीकारण्याचा त्यांनी सल्ला दिला. तसेच, स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान प्लॅन ‘बी’ तयार ठेवण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मानोरा येथील परिविक्षाधीन तहसीलदार तृप्ती खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना एमपीएससी आणि यूपीएससी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी दिशा निवडताना ती विचारपूर्वक ठरवावी आणि पदवी शिक्षणासोबत राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास या विषयांवर विशेष भर द्यावा. सोशल मीडियाचा अतिरेक टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. परिसंवादात जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ तसेच स्पर्धा परीक्षा वार्ता चे संपादक दिगंबर इंगळे यांनीही आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. गजानन वाघ यांनी केले.
परिसंवादानंतर जिल्हा परिषद शाळा, मोहजा रोड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘शिदोरी’ ही नाटिका विशेष आकर्षण ठरली. ग्रामीण स्त्रीचे जीवन वास्तवदर्शी पद्धतीने सादर करणार्या या नाटिकेने उपस्थितांना भावूक करत टाळ्यांचा कडकडाट मिळवला. एकूणच, या परिसंवादातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्पष्ट दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे , प्रभाकर घुगे तसेच ग्रंथमित्र धनंजय राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.