प्रदूषणामुळे संतप्त नागरिकांचा चक्काजाम

स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाला विरोध

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
नांदगाव पेठ, 
citizens-protest-due-to-pollution : परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या वडगाव माहोरे येथील नागरिकांनी अखेर बुधवारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाविरोधात जोरदार चक्काजाम आंदोलन उभारले. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत गावकर्‍यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गावकर्‍यांनी रास्ता रोको करत वडगाव मोहोरे रस्ता रोखून धरला. गिट्टी, मुरूम वाहतूक करणारी सर्व वाहने थांबली होती. यामुळे बराच वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
 
 
AMT
 
 
 
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्र्यांच्या तक्रार निवारण मेळाव्यात सादर केलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला. आरोग्याशी तडजोड नाही, अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख संजय पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाने प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. यावर तातडीने कारवाई करत संबंधित प्रकल्प बंद करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
 
 
दरम्यान, महसूल विभागाचे जिल्हा उपदंडाधिकारी अनिल भटकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदूषण विभागाने दाखवलेल्या नियमभंगाच्या आधारे विभागामार्फत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्प बंद करण्याचे परिपत्रक काढले जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तसेच, नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन देत प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधला जाईल, असे स्पष्ट केले.
 
 
प्रशासनाकडून मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले असले तरी, जोपर्यंत प्रकल्प पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह वडगाव माहोरे येथील युवा नेते अक्षय चव्हाण, प्रशांत किटूकले, ऋषी पडोळे, राहुल नेमाडे, चंद्रशेखर दारोकार, नंदू गौरकर, हरीश मेश्राम यांच्यासह भवानी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.