मद्यधुंद इसमांचा अंजनगाव रूग्णालयात धुडगूस

-डॉक्टरांवर दगडफेकीचा प्रयत्न -पोलिसांकडून कारवाई

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
अंजनगाव सुर्जी, 
anjangaon-hospital : येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मद्यधुंद इसमांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामात अडथळा निर्माण करत गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या इसमांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वेळीच रुग्णालयातील सुरक्षारक्षक व कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
 
 
KL
 
 
 
अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दुपारी २ वाजताच्या सुमारास सुनील प्रल्हादराव सदार (वय ५३, रा. जोळ-जवळा, ता. अंजनगाव सुर्जी) व रवींद्र पद्माकर घेंबळ (वय ५४, रा. भुगाव, ता. अचलपूर) हे दोघे मद्यधुंद अवस्थेत ओपीडीची चिट्ठी काढण्यासाठी आले. त्यावेळी रुग्णालयाची वेळ संपलेली असतानाही त्यांनी दवाखाना बंद का आहे, असा सवाल करत जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोघांनीही वैद्यकीय अधिकार्‍यांना उद्देशून शिवीगाळ करत धमक्या दिल्या. डॉक्टरांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संतापून दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित सुरक्षारक्षक व रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व डॉक्टरांचा बचाव केला.
 
 
रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास अंजनगाव पोलिसांकडून सुरू आहे.