परतवाड्यात गुंडगिरी, दुकानदारावर हल्ला

व्यापारी पोहोचले नगर परिषदेत

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
अचलपूर, 
hooliganism-paratwada : परतवाडा शहरातील गुजरी बाजार परिसरात मंगळवारी दुपारी गुंडगिरी पाहायला मिळाली. दुकानासमोर मालवाहु ऑटो लावण्यास मनाई केल्याच्या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या एका ऑटो चालकाने थेट लोखंडी रॉडने बुक स्टॉलधारक पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला केला. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
 
J
 
 
 
शहरातील गुजरी बाजारातील राज बुक डेपोचे संचालक अरुण खंडेलवाल (४८) आणि त्यांचा मुलगा राज खंडेलवाल (२७) हे दुकानात असतानाच आरोपीने त्यांच्या दुकाना समोर मालवाहु गाडी लावली. ती हटवण्याच्या कारणावरून वाद घालत आरोपीने दोघांनाही रॉडने मारहाण केली. तुझ्या बापाची जागा आहे का? अशा उर्मट भाषेत धमकावत आरोपीने थेट प्राणघातक हल्ला चढवला. काही क्षणांतच पितापुत्र दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यापार्‍यांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
 
 
आरोपी रियाज शेख नूर बेग (४०, रा. इमान नगर, अमरावती) याचा खंडेलवाल कुटुंबीयांशी मागील पंधरा दिवसांपासून वाद सुरू होता. सकाळीच तुम्हाला बघून घेईन अशी उघड धमकी देऊन गेलेला आरोपी दुपारी लोखंडी रॉड घेऊन परत आला आणि हल्ला घडवून आणला. या गंभीर घटनेनंतर परतवाडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध विवीध कलम अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे गुजरी बाजारातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचलपुर नगरपालिकेत पोलिस, व्यापारी, नगराध्यक्ष यांच्यात बैठक झाली. यात आरोपीवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल करावा, व्यापारी पेठेत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करावा आणि परिसर ‘नो-हॉकर झोन’ घोषित करावा, अशी ठाम मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी केली आहे.