तभा वृत्तसेवा
ढाणकी,
Mahavitaran arbitrary governance : महावितरणच्या ढाणकी येथील सहायक अभियंत्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि सक्तीने बसवल्या जाणाèया स्मार्ट मिटरविरुद्ध आता नागरिक आणि लोकप्रतिनिधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीयांच्या वतीने थेट महावितरण अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले गेले. मुजोर सहायक अभियंता यांचा मनमानी कारभार सुरू झाला असून सर्वपक्षीयांतर्फे या संदर्भात उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन प्रशासकीय कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात महावितरणच्या कारभारावर गंभीर ताशोरे ओढत महावितरणवर आरोप करण्यात आले. महावितरणकडून स्मार्ट मिटरची सक्ती करत ग्राहकांना विविध आमिषे दाखवून किंवा भीती घालून स्मार्ट मिटर बसवण्यास भाग पाडले जात आहे. या सक्तीला नागरिकांचा तीव्र विरोध असून याबद्दल अधिकाèयांना भेटण्यासाठी गेले तर अधिकारी अनुपस्थित राहतात. सहायक अभियंता मुख्यालयी हजर नसल्याने ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा थेट परिणाम नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजनेवर होत असून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
वीज पुरवठ्याबाबत विचारणा केल्यास संबंधित अधिकारी ग्राहकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात आणि घरी जाऊन अपमानास्पद वागणूक देतात, असा आरोप करत सहायक अभियंता कर्तव्यात कसूर करत असतानाही वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
निवेदन देतेवेळी नगरसेवक संजय सलेवाड, काँग्रेसचे बाळू चंद्रे, जॉन्टी विनकरे, मनसेचे सादिक शेख, ख्वाजा कुरेशी, उबाठा शिवसेनेचे सूर्यकांत वासमवार, फिरोज, बंटी वाळके, संभाजी गोरटकर, शेख जब्बार, राकाँचे संतोष मंतेवाड, सचिन तोटेवाड, पवन वचेवार, एमआयएमचे बशीर, अमोल तुपेकर, शिवाजी वैद्य यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणचा मनमानी कारभार सुरू असून वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. सहायक अभियंत्यांना नागरिकांनी विचारणा केल्यास ते अरेरावीची भाषा करत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात खूप वाढ झाली आहे. उकाड्यापासून सुटका मिळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पंखे, कूलर निरुपयोगी आहेत. चिमुकले व वृद्धांना याचा नाहक त्रास होत आहे. कार्यकारी अभियंता सहायक अभियंत्यांची पाठराखण करीत आहेत. यानंतर ढाणकीतील नागरिकांची विजेसंबंधी तक्रार आल्यास त्यामुळे होणाèया नुकसानास सर्वस्वी जबाबदार महावितरण राहील.
- संजय सल्लेवाड