नगर परिषद व पंचायतींना प्रत्येकी एक कोटी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sanjay-rathod : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ राज्यातील महानगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे.
 
 
y25March-Sanjay-Rathod
 
 
 
या अभियानांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान आणि नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
 
 
या अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील यवतमाळ, ‘ब’ दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, ‘क’ वर्गातील घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर, पांढरकवडा या नगर परिषदा आणि राळेगाव, कळंब, महागाव, मारेगाव, बाभुळगाव, झरीजामणी आणि ढाणकी या नगर पंचायत क्षेत्रांतील मराठी शाळांची दर्जोन्नती, आरोग्य सुविधा, पर्यावरण व स्वच्छता तसेच पर्यटन विकासाला चालना देण्यास मदत होणार आहे.
 
निधीची तरतूद
राज्यातील महानगर पालिकांना प्रत्येकी 5 कोटी निधी देण्यात येणार असून नगर परिषद व नगर पंचायतींना प्रत्येकी 1 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी विविध नागरी विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
 
निधी वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे
अभियानांतर्गत किमान 50 टक्के निधी मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उर्वरित निधी आरोग्य सुविधा (आरोग्य केंद्र, साहित्य, महिलांसाठी सॅनिटरी पॅड मशीन), पर्यावरण व स्वच्छता तसेच पर्यटन विकासासाठी वापरण्यात येणार आहे. ज्या नगर परिषद किंवा नगर पंचायतींमध्ये शाळा नाहीत, त्यांनी 50 टक्के निधी आरोग्य सुविधांसाठी वापरणे बंधनकारक राहणार आहे.
अभियानाचा कालावधी व स्पर्धा
या अभियानाचा प्रारंभिक कालावधी एक वर्षाचा असून कामगिरीच्या आधारे तो वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच महानगर पालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये विकास कामांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
पारितोषिके
या स्पर्धांमधील विजेत्यांना महानगर पालिका स्तरावर प्रथम 10 कोटी, द्वितीय 7 कोटी व तृतीय 5 कोटी अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी व तृतीय 2 कोटी अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
उद्दिष्ट
या अभियानाचा मुख्य उद्देश नागरी भागात मूलभूत सुविधा मजबूत करणे, मराठी शाळांची गुणवत्ता वाढवणे, महिलांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करणे तसेच पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर शहरे विकसित करणे हा आहे. या निधीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरी भागांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार
 
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद आणि पंचायतींना आर्थिक बळ मिळणार आहे. या निधीमुळे नागरी भागातील मराठी शाळांचा विकास, आरोग्य सुविधांची उपलब्धता, पर्यावरण संरक्षण व स्वच्छता आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
पालकमंत्री संजय राठोड