दिवसाढवळ्या झाली तरुणाची हत्या

शहरात थरार : तीन आरोपी अटकेत

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
नेर, 
murder-of-a-young-man : येथील इलिगंट इंग्लिश मिडियम विद्यालयाजवळ मंगळवारी दुपारी दीडच्या दरम्यान शहरातील एका पानटपरी चालक तरुणाची हल्लेखोरांनी हत्या केली. दिवसाढवळ्या अत्यंत रहदारीच्या मार्गावरील या हत्येने शहरात थरार आणि घबराट निर्माण केली आहे.
 

JK 
 
शहबाज हसन तसदीक हसन पठाण (वय 40 वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या हल्ल्यातील आरोपी म्हणून पोलिसांनी मोहंमद साहिल मोहंमद इस्राईल, फैजानखान जमीलखान आणि उजेफखान एजाजखान या तीन तरुणांना अटक केली असून तीनही आरोपी 19 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत.
 
 
मृतक शहबाजखान यांचा मोठा भाऊ जावेदखान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 351 (2) (3) (5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
 
प्राप्त माहितीनुसार मृतक शहबाज यांच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीला हे आरोपी युवक वारंवार त्रास देत होते. याबद्दल त्यांना शहबाजखान यांनी समज देऊन त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
 
 
मात्र या आरोपींनी हा राग मनात बाळगून त्यांना रस्त्यात गाठले व त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. घायाळ अवस्थेतील शहाबाजखान यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाèयांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
 
 
नेर शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या अल्पवयीन मुलींची छेडखानी व लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी पालक धास्तावले असताना मृतकाच्या नाते संबंधातील एका अल्पवयीन मुलीला त्रास देण्यामुळे हटकले असता त्यांचा खूनच करण्यात आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.