इराणच्या काश्मीरवरील भूमिकेमुळे पाकिस्तान संतप्त

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Pakistan angered by Iran's stance पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने काश्मीर संदर्भात केलेल्या एका विधानामुळे पाकिस्तानात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इराणी दूतावासाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून एक संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये भारत आणि काश्मीर सोबत भारताचेही आभार मानले होते. या विधानामुळे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सूचित होत असल्याचा अर्थ काढत पाकिस्तानमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानी नागरिकांनी आणि काही अधिकृत खात्यांनी या विधानावर तीव्र टीका केली. अनेकांनी इराणने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली, तर काहींनी इराणवर पाकिस्तानच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून भारताच्या बाजूने झुकत असल्याचा आरोप केला.
 
 
 
modu
 
समाजमाध्यमांवर या विधानाचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आणि या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू झाली.त्यानंतर इराणी दूतावासाने संबंधित संदेश हटवून एक सुधारित निवेदन प्रसिद्ध केले. या नव्या संदेशात केवळ भारताबद्दल आभार व्यक्त करण्यात आले, मात्र काश्मीरचा उल्लेख टाळण्यात आला. या बदलामुळे इराण दोन्ही देशांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत इराण भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. भारताने देखील अलीकडच्या काळात इराणला काही प्रकारचे सहकार्य आणि पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान इराणला आपला पारंपरिक मित्र मानतो आणि त्यामुळे काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यावर इराणकडून कोणतेही वक्तव्य आले की त्यावर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटते.या घटनेमुळे पश्चिम आशियातील तणाव आणि राजनैतिक समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, इराणच्या भूमिकेबाबत विविध मतप्रवाह समोर येत आहेत.