अफवांचा बाजार अन् मिनिटात खपलं हजार लिटर!

पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा, तरीही ग्राहकांची तोबागर्दी

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
petrol-diesel-shortage : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यांचा समाज माध्यमांवर अफवांचा बाजार पसरला. इंधन तुटवड्यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची माहिती सर्वदूर पसरली आणि मंगळवारी शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर ग्राहकांनी हल्लाबोलच केला. एकेका पेट्रोल पंपावर ५०० च्या वर ग्राहकांची वाहने लागली. प्रत्येक ग्राहक ‘टंकी फुल्ल’ म्हणत होते. विशेष म्हणजे, पोलिस वसाहत पुढे असलेल्या पेट्रोल पंपावर काही मिनिटात हजार लिटर पेट्रोल विक्री झाल्याची माहिती आहे.
 
 
K
 
 
 
पेट्रोल पंप बंदच्या अफवेमुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी गर्दी केल्याने पेट्रोल-डिझेलची दुप्पट विक्री झाली. यामुळे अनेक पेट्रोलपंपांतील इंधन साठा संपल्याने बुधवारी काही पेट्रोलपंप बंद होते. जिल्ह्यात सरासरी १.४० लाख लिटर पेट्रोल तर ३ लाख लिटर डिझेलची विक्री होते. पण, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात २.६० लाख लिटर पेट्रोल तर ४ लाख लिटर डिझेलची विक्री झाली. तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे. २४ रोजी एकाच दिवशी तब्बल २.६० लाख लिटर पेट्रोल तर ४ लाख लिटर डिझेलची विक्री झाली.
 
 
जिल्ह्यात ८८ पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोल पंपावरून दररोज १.४० लाख लिटर पेट्रोल तर ३ लाख लिटर डिझेलची विक्री होते. पेट्रोल पंपांवर नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने अधिकार्‍यांना विविध पेट्रोल पंप गाठून ग्राहकांना पेट्रोल-डिझेलचा जिल्ह्यात मुबलक साठा आहे. पेट्रोल पंप बंद राहणार, ही केवळ अफवा असल्याचे समजावून सांगण्याची वेळ आली होती.
 
 
धोत्रा रेल्वे परिसरात नायरा कंपनीचा पेट्रोल व डिझेलचा मोठा डेपो आहे. या डेपोत सध्या ३ हजार २४१ लाख किलो लिटर पेट्रोल तर ६ हजार ६५६ लाख किलो लिटर डिझेलचा साठा आहे. शिवाय तेथील पुरवठा, वितरण आणि शिल्लक साठ्याची माहिती वेळोवेळी जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांकडून घेतली जात आहे.
 
 
जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद राहणार नाही. नागरिकांनीही अफवांना बळी पडू नये. अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी होत आहे. दररोजच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलची दुप्पट विक्री झाली आहे. स्टॉक संपलेल्या पेट्रोल-पंपांना लवकरच साठा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा असून जो कुणी अफवा पसरवेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रीया प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी बोलताना दिली.
 
 
दोन सुट्ट्यांनी केली गडबड
 
 
पेट्रोल कंपनी पेट्रोल पंप धारकांकडून आधी क्रेडिटवर पेट्रोल देत होते. आता पेट्रोल कंपनीवाले रोख पैसे घेत आहेत. शनिवार, रविवारी सुट्ट्या आल्याने पैसे कंपनीत भरल्या गेले नाही. त्यामुळे पेट्रोल मिळू शकले नाही. अशीच परिस्थिती नागपुरात झाल्याने ती अफवा वर्धेत पोहोचली. दुपारपर्यंत पेट्रोल मुबलक होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणवीर यांनी सांगितले. पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. सर्वांना पेट्रोल मिळेल असे आरती चौकातील पेट्रोल पंप मालक सोमाणी यांनी सांगितले