तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
rape-case-against-minor-girl : तालुक्यातील कृष्णापूर येथील विकास आनंद सुरपाम याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्या. अभिजित देशमुख यांनी 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या अल्पवयीन पीडितेवर विकास सुरपाम याने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे 4 महिन्यांची गरोदर असलेल्या या अल्पवयीन पीडितेने विकासकडे लग्नाची मागणी केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली, उलट तिलाच धमकावले. त्यामुळे या अल्पवयीन पीडितेने अखेर पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दखल केली. त्यावरून आरोपीविरुद्ध भांदवि कलम 376 (2) (एन), 506, 417 सहकलम 6 मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संजीव खंदारे यांनी तपास करून केळापूर विशेष न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
सरकारकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमेश मोरे यांनी एकूण 7 महत्वाचे साक्षीदार तपासले. न्यायालयाने पीडिता, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी व इतर परिस्थितीजन्य पुराव्यानिशी सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपी विकास सुरपाम यास शिक्षा सुनावली.
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये 10 वर्षे कारावास व 5,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास, तसेच भादंविनुसार 1 वर्ष कारावास व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस कारावास, तसेच कलम 506 भांदविमध्ये 1 वर्षे कारावास व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 8 दिवस कारावास अशी शिक्षा ठोठावली.