राष्ट्रसंत वसमतकर महाराज गिरनार पर्वताकडे रवाना

स्वच्छता अभियानासह दत्तनाम सप्ताहाचे आयोजन

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर,
rashtrasant-vasmatkar-maharaj : श्री दत्तनामाचा प्रचार-प्रसार तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती तथा महाराष्ट्र शासनाचे ‘ब्रँड अँबेसिडर’ साईनाथ महाराज (वसमतकर) यांच्यासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत माहूरगड येथून गिरनार पर्वताकडे विशेष वारी मार्गस्थ झाली.
 
 
 
y25March-Dattadham
 
 
 
साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनात या महादत्तनाम सप्ताह तथा स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तभक्तांमध्ये श्री दत्तनाम स्मरणाची भावना दृढ व्हावी, तसेच स्वच्छतेचा संदेश समाजात पोहोचावा हा या वारीचा मुख्य उद्देश आहे.
 
 
माहूर येथून सुरू झालेली ही वारी गुजरात राज्यातील पवित्र गिरनार पर्वत जुनागढ येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासह अनेक ठिकाणी श्री दत्त जप स्वच्छता अभियान, तसेच गिरनार येथे श्री दत्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, दत्तनामाचा जागर, कीर्तन-प्रवचन तसेच भक्तांना स्वच्छतेबाबत प्रेरणा देण्यात येणार आहे.
 
 
या प्रसंगी आश्रमाचे कार्यकर्ते, श्री दत्तभक्त तसेच विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अन्न वाया न घालवणे, गरजूंची मदत करणे, महिला सशक्तीकरण, वृक्ष लागवड व स्वच्छता तसेच दशसूत्रीचे महत्त्व समाजात पोचवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
 
 
आनंद दत्तधाम आश्रमाच्या या उपक्रमामुळे श्री दत्तभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दत्तनामाचा प्रचार-प्रसार आणि स्वच्छतेचा संदेश देशभर पोहोचेल अशी आशा व्यक्त करून श्री दत्तभक्तांनी गिरनार पर्वतावर दत्तनाम सप्ताहात उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी केले आहे.